Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली महापालिका निवडणुकीची तारीख

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली महापालिका निवडणुकीची तारीख
 

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता राजकीय पक्ष मैदानात उतरले असून पक्षाचे मेळावे, बैठका आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. नाशिक येथे आज भाजपच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीखच सांगितली. तर, केवळ नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, नेत्यांपुढे चमकोगिरी करू नका असे स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संधी म्हणून वाट पाहणाऱ्या भाजप  कार्यकर्त्यांना आता आपलं तिकीट फिक्स करण्यासाठी मैदानात उतरुन काम करावे लागणार आहे.

नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेल्या विकासाच्या कामांची माहिती देण्यासाठी भाजपच्यावीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या 11 वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांची उजळणी करुन ती कामे जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत, त्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकांची तारीखच जाहीर केली. ही कार्यशाळा मोदींच्या 11 वर्षाची कारकीर्द सांगण्याची आहे. आगामी निवडणुकीत एक-एक मत महत्वाचं आहे, कमळ चिन्हावर लढणाऱ्याला एकाही कार्यकर्त्याला निवडणूक हरू द्यायची नाही हा संकल्प आम्ही घेतला आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण, शेतकरी वीज बिल माफ हे निर्णय आपल्या सरकारने घेतले होते. आता, 15 ऑगस्टला स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लागेलंच, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमधून महापालिका निवडणुकीची तारीखच सांगितली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवत 'सिंदूर'चा बदला घेतला, तो दुसऱ्या सरकारनं घेतला नसता, असेही यावेळी बावनकुळेंनी म्हटलं.

गिरीश महाजनांकडून 100 प्लसचा नारा
नाशिक महापालिका निवडणुकांसाठी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी 100 प्लसचा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकांसाठी युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा नारा महाजन यांनी पक्षाच्या मेळाव्यात दिला आहे. नाशिकमध्ये आयोजित भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत गिरीश महाजन यांनी महायुतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. गटबाजी थांबून महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा अशा सूचनाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे येथील सूत्रसंचालकांकडून गिरीश महाजन यांचा संभाव्य पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्याने काहींच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.