Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड

वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
 

नोएडा सेक्टर-५५ येथील 'जन कल्याण ट्रस्ट'द्वारे संचालित 'आनंद निकेतन वृद्ध सेवा आश्रम'मध्ये राहणाऱ्या वृद्ध महिला आणि पुरुषांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. त्यांना हात बांधून खोलीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी राज्य महिला आयोगाच्या सदस्य मीनाक्षी भराला यांनी पोलीस-प्रशासनाच्या पथकासह या आश्रमावर कारवाई करत, वृद्धांची सुटका केली.

आयोगाच्या सदस्यांनी तात्काळ आश्रम सील करण्याचे आणि वृद्धांना इतर वृद्धाश्रमात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. मीनाक्षी भराला यांनी माहिती दिली की, सोशल मीडियावर या आश्रमाचा एक व्हिडिओ आणि काही फोटो व्हायरल झाले होते. या व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेचे हात बांधलेले दिसत होते आणि ते सोडले जात होते. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा दावा होता की, ही परिस्थिती सेक्टर-५५ मधील आनंद निकेतन वृद्धाश्रमाची आहे आणि येथील बहुतेक वृद्धांना याच प्रकारे दयनीय स्थितीत ठेवले जाते. 
 
या व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी गंभीर दखल घेऊन आवश्यक कारवाईचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, गुरुवारी मीनाक्षी भराला नोएडा येथे पोहोचल्या. त्यांच्यासोबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा प्रोबेशन अधिकारी आणि पोलिसांचे पथक होते. तपासणीदरम्यान, एक वृद्ध महिला बांधलेल्या अवस्थेत आढळली, तर पुरुषांना तळघरासारख्या खोल्यांमध्ये बंद करून ठेवले होते. त्यांची अवस्था पाहून त्यांचे जीवन नरकापेक्षाही वाईट असल्याचे जाणवत होते.

आश्रम बेकायदेशीर, नोंदणीकृत नाही!
 
तपास पथकाने आश्रम चालकाकडे कागदपत्रे मागितली असता, तो कोणतीही कागदपत्रे दाखवू शकला नाही. या वृद्धाश्रमाची स्थापना १९९४ मध्ये झाली असली तरी, त्याची नोंदणी नसल्याने तो बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा प्रशासनाला आश्रमातील वृद्धांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि आश्रम सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वृद्धांना संखलीने बांधले, अंगावर अपुरे कपडे
आयोगाच्या सदस्यांनी सांगितले की, तपासणी केली त्यावेळी वृद्ध महिला आणि पुरुष खोलीत बंद होते. दरवाजे उघडून आत प्रवेश केला असता, एका महिलेचे हात बांधलेले होते, जे तात्काळ सोडण्यात आले. तर, पुरुषांच्या अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. अनेक महिलांच्या शरीरावरही अपुरे कपडे होते. त्यांना तात्काळ कपडे उपलब्ध करून देण्यात आले. या सर्व वृद्धांना लवकरच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे.
अडीच लाखांचे अनुदान घेऊनही दुर्लक्ष
 
मीनाक्षी भराला यांनी सांगितले की, आश्रम व्यवस्थापन प्रत्येक वृद्धाकडून अडीच लाख रुपये अनुदान म्हणून घेते. याशिवाय २० हजार रुपये सुरक्षा रक्कम आणि प्रति महिना १० ते १२ हजार रुपये राहण्यासाठी आणि जेवणासाठी घेतले जातात. विशेष म्हणजे, या आश्रमात नोएडातील अनेक श्रीमंत कुटुंबातील वृद्ध पालकही राहत होते.

कर्मचाऱ्यांची वानवा, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन
वृद्धांची काळजी घेण्यासाठी कोणतेही कर्मचारी नव्हते. वृद्ध स्वतःच आपले दैनंदिन व्यवहार करत होते. अनेक वृद्धांचे कपडे मलमूत्राने माखलेले आढळले. तपासणी पथकाला येथे एक महिला भेटली, जिने स्वतःला नर्स म्हटले, परंतु चौकशीत ती फक्त १२ वी पास असल्याचे समोर आले. आश्रमात नियम-कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत होते. आश्रम व्यवस्थापनाने आपल्या बचावासाठी असा युक्तिवाद केला की, काही वृद्धांना स्वतःला इजा होऊ नये, म्हणून त्यांचे हात हलक्या कापडाने बांधले जातात. यापूर्वी अनेकांनी स्वतःला इजा पोहोचवली होती किंवा घाण इतरांवर फेकली होती, त्यामुळे त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी असे केले जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.