मनपाचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्तांना सहआरोपी करा:, जिल्हा संघर्ष समिती
सांगली : शहरातील 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी महापालिका उपायुक्त वैभव साबळे याला अटक झाली; पण यामागे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचाही सहभाग होता.
त्यांनी बांधकाम परवान्याच्या प्रस्तावात चारवेळा त्रुटी काढल्या होत्या. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करावे; अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे तक्रारदार तथा जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर आणि वास्तुविशारद रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, आमराई परिसरात सी. के. असोसिएटस्तर्फे 24 मजली इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिला होता. तो देण्यासाठी कंपनीकडे साबळे याने लाच मागितली होती. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी रुईकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार साबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली. लाच मागण्यामागे मुख्य सूत्रधार तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता हेच आहेत.
ते म्हणाले की, कोणताही बांधकाम परवाना 60 दिवसांपेक्षा जास्त काळ महापालिकेला अडवून ठेवता येत नाही. आमचा प्रस्ताव 240 दिवसांहून अधिक काळ प्रलंबित ठेवला होता. आयुक्त गुप्ता यांनी फक्त एका सहीसाठी फाईल अडवली होती. गंभीर तथ्य नसलेल्या त्रुटी काढून फाईल चारवेळा परत पाठवली. या त्रुटींची पूर्तता करून परवाना देण्यास विलंब लावला. प्रति सदनिकेसाठी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यांच्या सूचनेवरून साबळे यांनी पैशाची मागणी सुरू केली होती.
गुप्ता यांनी पैशाची थेट मागणी केली नसली तरी, सबळ कारण नसताना काम अडवून ठेवणे हाही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाच होतो. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.
घरात बसून कामांना मंजुरी
तत्कालीन आयुक्तांनी घरात बसून त्यांच्या आयपी अॅड्रेसवरून किती कामांना मंजुरी दिली, याची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करणार आहोत. त्यांनी किती प्रस्ताव नाकारले, याची माहिती सायबरतज्ज्ञांमार्फत तपासली आहे. ही सर्व माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात येणार आहे. 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यापोटी महापालिकेला सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा महसूल मिळणार होता. मात्र, आयुक्तांनी दहा लाखांसाठी हा महसूल अडवून ठेवला. यामध्ये महापालिकेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोपही रवींद्र चव्हाण यांनी केला. उपायुक्त साबळे याच्या अटकेची माहिती महापालिकेने शासनाला कळवली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.