शिवसेना (उबाठा) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पावसाळ्यात तुरुंगात जातील अशा आशयाचे विधान भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हणजेच 6 जून रोजी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेसोबतच्या युतीबद्दल एक विधान केले होते.
त्यांच्या या विधानावरून ते युतीसाठी सकारात्मक असल्याचे वाटू लागले आहे. नितेश राणे यांनी हा सगळा फार्स असल्याचे म्हटले आहे. मिठी नदी गाळ घोटाळ्याप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आणि या मुद्दावरून लक्ष विचलित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एकत्रीकरणाच्या चर्चेला हवा देणे सुरू केल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
धाराशिवमध्ये बोलत असताना नितेश राणे यांनी म्हटले की, डिनो मोरिया हा कोणासोबत बसायचा? कोणासोबत त्याचे संबंध आहेत ? हे सगळ्यांना माहीत आहे. याच प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो. मिठी नदीतून गाळ काढण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र मिठी नदीतून गाळ न काढता त्याची बिले देऊन पैसे उकळले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.मिठी नदी घोटाळ्याचा ईडीकडून तपास केला जात असून , ईडीला संशय आहे की निवडक पुरवठादारांना फायदा देण्यासाठी विशेष ड्रेजिंग उपकरणे भाड्याने घेण्यासाठीच्या निविदांमध्ये फेरफार करण्यात आला होता. या निविदा विशेष अटींसह तयार करण्यात आल्या होत्या. जेणेकरून इतर कुणाकडूनही स्पर्धा होऊ नये आणि पसंतीच्या कंपन्यांना निविदा मिळू शकतील. यानंतर, कंत्राटदारांनी गाळ वाहतूक करण्यासाठी बनावट बिले बनवली. एकतर ती कामे केली गेली नाहीत किंवा त्यांना जास्त रक्कम सादर करण्यात आली. अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की यामुळे बीएमसीला 65 कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. याच प्रकरणात डिनो मोरिया याची चौकशी करण्यात आली आहे.2007 ते 2021 दरम्यान कधीही न झालेल्या नदी स्वच्छतेच्या कामासाठी फसव्या देयकांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली ईओडब्ल्यूने यापूर्वी बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांसह 13 जणांवर गुन्हा दाखल केला होता.ईडीने जून महिन्यात पुन्हा एकदा छापेमारी केली होती. या छाप्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या घरांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून अभिनेता डिनो मोरियाची ओळख आहे. त्यामुळेच नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांनाही लवकरच अटक होईल असा दावा केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.