पणजी: गोव्यात खासगी वाहने म्हणजेच पांढऱ्या नंबरप्लेटची वाहने पर्यटकांना भाड्याने देणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. राज्य सरकारने शुक्रवारी (६ जून) एक अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अशा बेकायदेशीर रेंटल कार आणि बाईक चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. ज्यांच्याकडे रेंटल वाहन व्यवसाय
चालवण्याचा परवाना नाही, पण तरीही ते पर्यटकांना खासगी वाहने भाड्याने
देतात, अशा व्यक्तींवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
'काळ्या' धंद्याला चाप, पर्यटनात पारदर्शकता
गेल्या काही वर्षांपासून गोव्यात खासगी वाहनांचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक स्थानिक नागरिक आपल्या खासगी गाड्या पर्यटकांना भाड्याने देऊन पैसे कमावतात, ज्यामुळे परवानाधारक टॅक्सी आणि रेंटल व्यवसायांवर परिणाम होतो. गेल्या वर्षी गोवा पोलिसांच्या वाहतूक
शाखेने अशा खासगी वाहनांच्या व्यावसायिक वापरासाठी ६०० हून अधिक चालान जारी
केले होते. एकदा चालान मिळाल्यावर वाहन मालकांना न्यायालयात हजर होऊन दंड
भरावा लागतो.
नव्या अध्यादेशाचे परिणाम
आता या नव्या अध्यादेशामुळे ही कारवाई आणखी तीव्र होणार आहे. या अध्यादेशामुळे केवळ दंडच नव्हे, तर बेकायदेशीरपणे हा व्यवसाय करणाऱ्यांचे वाहन चालवण्याचे परवानेही रद्द केले जातील. यामुळे अशा 'काळ्या' धंद्याला आळा बसेल आणि गोव्याच्या पर्यटन व्यवसायात अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा आहे.या निर्णयामुळे परवानाधारक टॅक्सी चालक आणि रेंटल कंपन्यांना दिलासा मिळाला आहे, कारण ते अनेक वर्षांपासून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी करत होते. या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्यास, पर्यटकांनाही अधिकृत आणि सुरक्षित वाहने उपलब्ध होतील, अशी आशा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.