"लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात", शिंदेंच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर; म्हणाले, "कुठल्याही आमदाराला."
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. या योजनेसाठी वेगवेगळ्या विभागांचा निधी महिला व बाल कल्याण विभागाकडे वळवल्याची तक्रार अनेक आमदार व मंत्री करत असतानाच शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे की “या लाडकी बहीण योजनेमुळे राज्य संकटात आहे. या योजनेमुळे इतर कुठल्याही योजनेला पैसे मिळालेले नाहीत. कोणत्याही आमदाराला मागील अधिवेशनात जाहीर झालेला निधी मिळालेला नाही”.
विरोधकांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवरून केलेल्या आरोपांवरही संजय गायकवाड यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं विरोधकांचं मत आहे. त्यावर गायकवाड म्हणाले, “लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं आहे हे नाकारता येत नाही. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्वच बाबतीत झालेला आहे. ही चूक जुलै-ऑगस्ट पर्यंत भरून निघेल. एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाहीत”.
सव्वालाख कोटी रुपयांची तूट
संजय गायकवाड म्हणाले, “विरोधक म्हणतायत तशी राज्याची आर्थिक स्थिती नाजूक नाही, मात्र लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आहे. अर्थसंकल्पात सव्वा लाख कोटी रुपयांची तूट आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावरही परिणाम झाला आहे. मात्र, येत्या जुलै-ऑगस्टपर्यंत स्थिती सुधारेल आणि तूट भरून निघेल एवढं नक्की”.
कोणत्याही आमदाराला निधी मिळालेला नाही : संजय गायकवाड
शिवसेना (शिंदे) आमदारांना निधी मिळत नसल्याचा, त्यांना आर्थिक मदत मिळत नसल्याचा आरोप होत आहे. त्यावर संजय गायकवाड म्हणाले, “केवळ शिवसेना (शिंदे) आमदारांनाच नव्हे तर सर्वच पक्षांच्या आमदारांना निधी मिळालेला नाही. एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाहीत. मागील अधिवेशनात जाहीर झालेले पैसे मिळाले नाहीत. कुठल्याच विभागाला, कोणत्याही योजनेसाठी पैसे मिळालेले नाहीत. परंतु, कुठलाही आमदार त्यावर काही बोललेला नाही. लाडक्या बहिणींना सांभाळा असंच म्हणत आहेत. कोणी काही बोललेलं नाही. सर्व काही समाधानकारक होईल”.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.