बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या पहिल्या कलानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलने आघाडी घेतली आहे. ‘ब’ गटातून अजित पवार ९१ मते मिळवून विजयी झाले आहेत. याउलट, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘बळीराजा पॅनेल’चे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना फक्त १० मते मिळाली आहेत.
बारामतीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी चार पॅनेल मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा पॅनेल’, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनेल’, शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचे ‘सहकार बचाव पॅनेल’ आणि शेतकरी संघटनांचे पॅनेल मैदानात आहेत.माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी यंदा विक्रमी मतदान झाले होते. ‘ब’ वर्ग गटातून अजित पवार विजयी झाल्याने ‘निळकंठेश्वर पॅनेल’ने दमदार सुरुवात केली आहे. जरी अंतिम निकाल येणे बाकी असले तरी, हा पहिला कल पवार बंधूंमधील राजकीय संघर्षात अजित पवार गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या अतिशय चुरशीच्या लढतीत कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
दरम्यान बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज (२४ जून) सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. बारामतीतील प्रशासकीय भवनात मतमोजणी सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विक्रमी मतदानामुळे निकालाची उत्सुकता
या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झाले होते. यामध्ये ‘अ’ वर्गात ८८.४८ टक्के मतदान झाले. ज्यात १२,८६२ पुरुष आणि ४,४३४ स्त्रिया अशा एकूण १७,२९६ मतदारांनी (१९,५४९ पैकी) आपला मतदानाचा हक्क बजावला. तर ‘ब’ प्रवर्गात ९९.०२ टक्के विक्रमी मतदान झाले, ज्यात १०२ मतदारांपैकी ९९ पुरुष आणि २ स्त्रियांनी सहभाग घेतला. या विक्रमी मतदानामुळे निकालाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.