'फ्रिज' ही स्वयंपाक घरातील एक अशी वस्तू आहे की, जी आपल्यात सगळं काही सामावून घेते. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी काही उरलं - सुरलं की सरळ टाका फ्रिजमध्ये हाच नियम वापरतात. या सवयीमुळे फ्रिज ही अशी वस्तू बनते की त्यात कपाटाप्रमाणेच सगळं काही कोंबून, भरभरुन ठेवलं जात. फ्रिज उघडला की आपल्या सगळ्यांच्याच फ्रिजमध्ये काही गोष्टी या हमखास कायम ठेवलेल्या दिसतातच. सॉस - चटण्यांची लहान पाकीट, मिरच्या, कडीपत्ता असं बरंचसं साहित्य हे फारच कॉमन असत यापैकीच एक पदार्थ म्हणजे लिंबू, फ्रिज उघडला की उजव्या हाताला असणाऱ्या दाराजवळच्या छोट्याशा कप्प्यात अर्धवट चिरलेला ठेवलेला लिंबू असतोच.
बरेचदा, आपण लिंबू चिरुन, अर्धा लिंबू वापरतो आणि अर्धा तसाच खराब होऊ नये म्हणून सरळ फ्रिजमध्ये कोंबून ठेवतो. हा इवलासा लिंबाचा तुकडा नंतर आपण वापरायला विसरुन जातो, मग कित्येक दिवस तो अर्धा लिंबू फ्रिजमध्ये तसाच पडून असतो. मग अचानक काही दिवसांनी लक्ष जाताच आपण तो लिंबू वापरतो, परंतु असा दीर्घकाळ फ्रिजमध्ये चिरुन ठेवलेला लिंबू वापरणे कितपत योग्य आहे ? नोएडाच्या क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट रक्षिता मेहरा यांनी फ्रिजमध्ये दीर्घकाळ चिरुन ठेवलेला लिंबू वापरावा की वापरु नये याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे.
लिंबू अर्धवट चिरून फ्रिजमध्ये स्टोअर करणे योग्य की अयोग्य ?
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट रक्षिता मेहरा यांच्या मते, अर्धवट कापून फ्रिजमध्ये ठेवलेला लिंबू पुढील ३ दिवसांत आणि योग्य पद्धतीने तो स्टोअर करुन ठेवला असेल तरच असा लिंबू पुन्हा वापरणे योग्य आहे. फ्रिजमध्ये अर्धवट कापून ठेवलेले लिंबू योग्यरित्या स्टोअर केले गेले नाही किंवा जास्त दिवस ठेवलेले असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील असू शकते. इतकेच नाही तर कापलेले लिंबू फक्त ३ दिवसांसाठी फ्रिजमध्ये ठेवावे. जर ३ दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने ते खराब होऊ लागते, लिंबाची चव आणि ताजेपणा कमी होतो, कालांतराने ऑक्सिडेशनमुळे लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' नष्ट होते, ज्यामुळे त्याचे पोषण कमी होते. याशिवाय, ३ दिवसांनी लिंबाच्या कापलेल्या भागावर बॅक्टेरिया किंवा बुरशी वाढू शकते, ज्यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
अर्धवट कापून ठेवलेला लिंबू फ्रिजमध्ये स्टोअर करण्याची योग्य पद्धत...
१. लिंबाचा कापलेला भाग हवेच्या फारसा संपर्कात येऊ नये म्हणून क्लिंग फिल्म किंवा फूड ग्रेड प्लास्टिक रॅपने झाकून ठेवा.
२. याचबरोबर आपण कापून ठेवलेला अर्धा लिंबू हवाबंद डब्यातही स्टोअर करुन ठेवू शकता.
३. अर्धवट कापलेला लिंबू फ्रिजमध्ये स्टोअर करताना अशा प्रकारे ठेवा की त्याची कापलेली बाजू खाली तोंड करून असेल. यामुळे लिंबू कोरडे होण्यापासून रोखता येईल आणि बॅक्टेरियाचा धोका कमी होतो.
फ्रिजमध्ये स्टोअर केलेला अर्धवट लिंबू कधी वापरु नये ?
१. जर फ्रीजमध्ये ठेवलेला लिंबू विचित्र दिसत असेल किंवा त्यातून घाणेरडी दुर्गंधी येत असेल, तर ते अजिबात वापरू नये.२. जर लिंबू पूर्णपणे शिजल्यासारखा, सुकलेला किंवा कोरडा दिसत असेल तर वापरणे टाळावे.३. जर लिंबावर पांढरी किंवा हिरवी बुरशी दिसली, तर ते वापरू नये. हे बुरशीजन्य संसर्गाचं लक्षण आहे आणि अशा लिंबाचा वापर आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.४. जर लिंबातून तीव्र आंबट किंवा कुजल्यासारखा वास येऊ लागला, तर ते खाणं टाळा, कारण हा लिंबू खराब झाल्याचं लक्षण असतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.