उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोलापुरातून धक्कादायक बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीसाने रविवारी (ता. 08 जून) औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या
मोटारीत आढळून आला आहे. या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ
उडाली आहे. ओंकार हजारे (वय ३२, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ,
सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे
नाव आहे. याबाबतची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे. याबाबतचा
तपास पोलिस करत आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ओंकार हजारे यांनी संघटनात्मक कामावर भर दिला होता. पक्षासाठी त्यांनी तरुणांचे संघटन केले होते. तरुणांमध्ये ते अण्णा या नावाने परिचित होते. त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे पक्षासह सोलापूरच्या राजकीय क्षेत्राचे नुकसान झाले आहे. एक उगवता राजकीय पदाधिकारी गमावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचेही मोठे नुकसान झाले आहे.ओंकार हजारे यांचा 2019 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून ओंकार हे कौटुंबीक कारणांमुळे निराशाच्या गर्तेत होते. त्यांच्या मेव्हण्याचे रविवारी (ता. 08 जून) लग्न होते. मात्र, त्या लग्नाचे निमंत्रणही ओंकार हजारे यांना देण्यात आलेले नव्हते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. रविवारी (ता. ०८ जून) सकाळपासून ते कोणालाही काही न बोलता घरातून बाहेर पडले होते. बराच वेळ घरी न आल्याने घरच्यांनी आणि मित्रांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोधाशोध करूनही ते सापडत नव्हते. शेवटी सुपर मार्केटजवळ थांबलेल्या मोटारीत ते सीटवर बसल्याचे दिसून आले. आवाज देऊनही ते गाडीचा दरवाजा उघत नव्हते.शेवटी गाडीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी ओंकार हजारे यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्याच अवस्थेत ओंकार हजारे यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. फौजदार चावडी पोलिस तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.