Breaking News ! शिक्षण घोटाळा : ३६ संस्थाचालकांची झोप उडाली, सचिव, मुख्याध्यापकही रडारवर ! शिक्षणक्षेत्रात खळबळ
नागपूर : दहावी-बारावीच्या निकालांत नागपूरचा क्रमांक मागील काही वर्षांपासून खालीच असल्याचे दिसून आले आहे. मुळात याला शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षणसंस्थाचालक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याची बाब समोर आली आहे. अधिकारी व संस्थाचालकांच्या हातमिळवणीतून पावणेसातशेहून अधिक नियमबाह्य शालार्थ आयडी जारी करण्यात आले. ज्यांना शिकवतादेखील येत नाही, अशा शिक्षकांची संस्थाचालकांनी शाळांमध्ये नियुक्ती करवून शासनाचे वेतन चालू करवून घेतले. अशा पद्धतीचे ३६ शिक्षण संस्थाचालक आता पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अपात्र मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांनी भंडारा येथील शिक्षण संस्थाचालक चरण चेटुले याला ताब्यात घेतले व त्यानंतर केवळ मुख्याध्यापकच नव्हे, तर शिक्षण संस्थाचालकदेखील यात सहभागी असल्याचे समोर आले. पोलिसांनी या गुन्ह्यासोबतच अपात्र शालार्थ आयडीच्या गुन्ह्यातदेखील सखोल तपास केला आहे. तीन उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यासह दोन्ही गुन्ह्यांत १८ जणांना अटक झाली. त्यांच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. यातूनच पोलिसांना ३६ शिक्षण संस्थाचालकांची नावे मिळाली आहेत. या सर्व शिक्षण संस्थाचालकांनी मागील अनेक वर्षांपासून 'अर्थपूर्ण' व्यवहार करत पात्रता किंवा क्षमता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती केली. त्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी तयार करून त्यांचे वेतन सुरू करवून दिले. हे सर्व संस्थाचालक आता एसआयटीच्या रडारवर आहेत. त्यांच्यासह शिक्षणसंस्थांचे सचिव, मुख्याध्यापक यांच्यावरदेखील लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अब तक ६८१
सुरुवातीला सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ५८० जणांचे शालार्थ आयडी नियमबाह्य पद्धतीने काढल्याचे समोर आले होते. मात्र एसआयटीने केलेल्या तपासात हा आकडा आता वाढला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी किंवा छाननी समितीसमोर कुठलाही प्रस्ताव न देता ६८१ जणांचे शालार्थ आयडी प्राप्त करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले आहे. या रॅकेटमध्ये सरकारी पातळीपासून शिक्षणसंस्था चालकांपर्यंतची मोठी 'चेन' आहे.
नवीन शैक्षणिक सत्रात नवे हादरे
एसआयटीकडून विविध मार्गानी तपास सुरू आहे. त्यामुळे नियमबाह्य शालार्थ आयडीप्रमाणेच अपात्र शिक्षक, रॅकेटमध्ये सहभागी असलेले संस्था सचिव, मुख्याध्यापक यांची यादीदेखील वाढण्याची शक्यता आहे. ६८१ शिक्षकांना लवकरच प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यातून या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे, हे नव्याने समोर येणार आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पूर्व विदर्भातील शालेय क्षेत्राला मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.