Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा अंत, सांगलीत महिलेला भरधाव डंपरने चिरडले

Breaking News! पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा अंत, सांगलीत महिलेला भरधाव डंपरने चिरडले
 

सांगली: पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर काळाने घाला घातला. भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी विश्रामबाग उड्डाणपुलावर घडली. पूनम सुशांत जाधव (वय २५, रा. कवलापूर, ता. मिरज) असे मृत महिलेचे नाव असून, या अपघातात त्यांचे पती  किरकोळ जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरचालकाला पकडून चांगलाच चोप दिला.

कवलापूर येथील जाधव दाम्पत्याचा हा नित्याचाच प्रवास होता. दीड वर्षापूर्वीच विवाह झालेले सुशांत आणि पूनम रोज सकाळी एकत्रच कामासाठी सांगलीत येत. सचिन हे पत्नी पूनम यांना विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात सोडून पुढे आपल्या कामावर जात असत. मंगळवारी (दि.२४) सकाळी साडेदहाच्या सुमारास उड्डाणपुलावरून जात असताना, पाठीमागून वेगाने आलेल्या काँक्रीट मिक्सर डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पूनम या डंपरखाली सापडल्या आणि सुमारे ५० फूट फरफटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती सुशांत रस्त्याच्या कडेला फेकले गेले. हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि काही अंतरावर डंपरचालकाला अडवून त्याला चोप दिला. पूनम यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून डंपरचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.