Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सातारा :-अलिशान बंगले, कोट्यवधींच्या गाड्या, 200 कोटींची जमीन, ओझी वाहणारा माथाडी कामगार कसा बनला करोडपती?

सातारा :-अलिशान बंगले, कोट्यवधींच्या गाड्या, 200 कोटींची जमीन, ओझी वाहणारा माथाडी कामगार कसा बनला करोडपती?



साताऱ्यातला स्वप्नपूर्ती बंगला आहे. हा टोलेजंग बंगला कोणा मंत्र्यांचा किंवा उद्योगपतीचा नाही. हा बंगला एका माथाडी कामगाराचा आहे असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

माथाडी कामगार म्हणजेच जो ओझी वाहतो तो कामगार. अशा या साताऱ्यातील एका माथाडी कामगाराची संपत्ती पाहून सगळेच अवाक झाले आहेत. त्याच्याकडे नुसता आलिशान बंगलाच नाही, तर 10 ते 15 कोटींच्या अलिशान गाड्याही आहेत. शिवाय मुंबईत तब्बल 200 ते 300 कोटींची जमीनही आहे. आता एवढी माया एका माथाडी कामगाराने कमावली कशी असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. हा माथाडी कामगार नक्की आहे तरी कोण हे आता पाहुयात.

ही माया जमवणारा माथाडी कामगाराचे नाव आहे दत्तात्रय भालेघेरे उर्फ दत्ता पवार. भाजप आमदार प्रवीण दटके यांनी मागील अधिवेशनात माथाडी कामगारांसंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी याच दत्ता पवार नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला. दत्ता पवारवर मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात दोन पॅन कार्ड काढल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचे साताऱ्यात दोन अलिशान बंगले आहेत. प्रवीण दटके यांनी NDTV मराठीशी बोलताना प्रश्न उपस्थित केले होते की , 10-15 कोटींच्या गाड्या, मुंबई सारख्या शहरात 200-300 कोटींची जमीन माथाड्याकडे कशी येते ? यात असलेला अधिकारी वर्षानुवर्षे त्याच पदावर कसा राहातो? भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी गेल्या अधिवेशनामध्ये यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर एसआयटीची घोषणा करण्यात आली होती..

मात्र एसआयटी चौकशीतून दत्ता पवारला वगळलं गेलं होतं. दत्तात्रय आत्माराम भालेघरे उर्फ दत्ता पवार अशा दोन नावांचे लेबल लावून फिरणारा हा व्यक्ती मूळचा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कोलेवाडी गावचा आहे. गावातील त्याचे खरे नाव दत्तात्रय भालेघरे असे आहे. जन्मदेखील याच गावात झाला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला दत्तात्रय घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे माथाडी कामगार म्हणून काम करू लागला. हळूहळू त्याचे इतर माथाडी कामगारांशी चांगले संबंध निर्माण झाले होते.


गावातीलच माथाडी कामगार मोठ्या संख्येने मुंबईत होते. त्यातूनच मुंबईत राजकारण्यांमध्ये त्याची उठबस वाढत गेली. पुढे माथाडी कामगारांचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली. मात्र या संधीचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी केल्याची चर्चा सुरू झाली. याचाच एक पैलू म्हणजे गावापासून मुंबईपर्यंत सर्वांनाच अचंबित करणारी अफाट संपत्ती त्याने कमवली आहे. माथाडी कामगारांच्या जीवावर मोठमोठ्या कंपन्यांना धमकावणं, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळणं अशा पद्धतीने ही संपत्ती जमवल्याचा आरोप तक्रारदार हरीश जावळकरांनी केला आहे. याच जावळकर यांनी दत्तात्रय भालेघरे उर्फ दत्ता पवारविरोधात 2 पॅनकार्ड असल्याची पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर गुन्हाही दाखल झाला होता.

दत्ता पवार हे राज्यातल्या माथाडी क्षेत्राला पडलेलं कोडं आहे. एका सामान्य घरातला मुलगा गावाकडून मुंबईत येतो. माथाडी कामगार म्हणून काम करताना ओझी वाहतो. आणि बघता बघता कोट्यवधींचा मालक होतो.माथाडी कामगार दत्ता पवारची ही कहाणी खरचं समजण्या पलीकडची आहे. पण आता याच दत्ता पवारच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनीही चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. पण याच दत्ताला राजकीय वरदहस्त असल्याचं ही बोललं जातंय. त्यामुळे त्याची चौकशी आणि कारवाई होणार का? हे ही एक कोडं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.