800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा उघड; शिंदे पिता-पुत्रांचा निकटवर्तीय अटकेत, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात 800 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणात शिंदे गटाशी संबंधित सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखे याला झारखंडच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACB) अटक केल्याचा दावा केला आहे. राऊत यांनी या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत
शिंदे मेडिकल फाऊंडेशनकडे वळवल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस
(शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर याबाबत
पोस्ट करत या घोटाळ्याची व्याप्ती वाढल्याचे म्हटले आहे.
800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा
संजय राऊत यांनी दावा केला आहे की, महाराष्ट्रात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेच्या कंत्राटात 600 कोटींनी टेंडर वाढवण्यात आलं. यामुळे एकूण 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनकडे वळवल्याचा गंभीर दावा राऊतांनी केला आहे. झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखे याला झारखंडच्या ACB ने पुण्यातून अटक केली. साळुंखे हा शिंदे गटाचा निकटवर्तीय असून, श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनशी संबंधित असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.महाराष्ट्रात 108 रुग्णवाहिका सेवेचं कंत्राट सुमित फॅसिलिटी कंपनीला देण्यात आलं होतं. या कंत्राटादरम्यानही विरोधकांनी गैरव्यवहारांचे आरोप केले होते. झारखंडमध्येही या कंपनीला मनुष्यबळ पुरवठ्याचं काम मिळालं होतं, जिथे कमी सर्व्हिस चार्जच्या निविदांद्वारे काम मिळवून घोटाळे करण्याची पद्धत असल्याचा दावा आहे.
संजय राऊतांचे आरोप
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, "झारखंडच्या ACB पथकाने अमित साळुंखेला पुण्यातून अटक करून झारखंडला नेलं आहे. साळुंखे श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनशी संबंधित आहे. या घोटाळ्याचे पैसे फाऊंडेशनकडे वळवले गेले. हा 800 कोटींचा घोटाळा आहे, आणि याचे धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचतात. निवडणुकीसाठी किती पैसे मागितले गेले, हेही लवकरच समोर येईल." राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात "साफसफाई" करण्याची गरज असल्याचा हल्लाबोल केला.
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट करत म्हटलं, "झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखेला ACB ने अटक केली आहे. महाराष्ट्रातही या कंपनीला 108 रुग्णवाहिकेचं कंत्राट मिळालं होतं, ज्यावर वाद झाले होते. कमी सर्व्हिस चार्जच्या निविदांद्वारे काम मिळवून घोटाळे करण्याची या कंपनीची पद्धत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.