भारतात एक शोधायला गेलात, तर शेकडो अवलिया आढळतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विविध घटनांमधून याची समस्त देशाला अन् कधीकधी तर जगालाही प्रचिती येत असते. त्यांचे कारनामे सर्वत्र चर्चेत येत असतात. असा एक 'पराक्रम' आर्यन सिंग या पठ्ठ्याने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनावर
एक नाही तर तीन वाहतूक चलन थकीत आहेत आणि त्यांनी ते लवकरात लवकर भरावेत,
अशी पोस्टच आर्यन सिंग याने एक्सवर केली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये
त्याने वाहतूक चलनाचा फोटो आणि मोदींच्या विशेष गाडीचाही फोटो शेअर केला
आहे.
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. यावर युजर्सकडूनही उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. आर्यन सिंगने केलेला दावा खरा आहे की खोटा यावर युजर्स मत मांडत आहेत. मात्र काहीजरी असलं तरी या पठ्ठ्याने थेट पंतप्रधान मोदींच्या गाडीचीच कुंडली काढली अन् ती थेट सोशल मीडियावर पोस्ट केल्याने चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे. आर्यन सिंग याने आपल्या एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''प्रिय, नरेंद्र मोदीजी, तमच्या वाहन क्रमांक DL2CAX2964वर तीन चलन प्रलंबित आहेत.कृपया वेळेवर चलन जमा करा आणि भविष्यात असे उल्लंघन टाळा.'' याचबरोबर आर्यन सिंग याने त्याच्या पोस्टसोबत एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मोदी टोयाट लँडक्रूझर कारमध्ये बसलेले दिसत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काहीजणांना प्रलंबित चलनाचे फोटो पाहून आश्चर्याचा धक्काही बसला आहे. तर काहींनी हे खोटे असल्याचेही मत व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे या आर्यन सिंगने आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय अन् दिल्ली वाहतूक पोलीस यांचे अधिकृत हँडल टॅग केले आहे. एवढंच नाहीतर त्याच्या पोस्टमध्ये वाहतूक उल्लंघन ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मचा स्क्रीनशॉट देखील होता, ज्यामध्ये उल्लेखित क्रमांकासाठी तीन प्रलंबित चलन दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.