Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"ती इतकी सुंदर दिसूच कशी शकते?"; प्रचंड जळफळाट झाला, मैत्रिणीनेच फेकलं मैत्रिणीच्या तोंडावर अॅसिड

"ती इतकी सुंदर दिसूच कशी शकते?"; प्रचंड जळफळाट झाला, मैत्रिणीनेच फेकलं मैत्रिणीच्या तोंडावर अॅसिड


मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मैत्रिणीने आपल्याच जिवलग मैत्रिणीवर ॲसिड हल्ला केला. तिने असं का केलं, यामागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.



आपली मैत्रीण सुंदर दिसते आणि तिची खूप प्रगती होत असल्यामुळे दुसऱ्या मैत्रिणीला प्रचंड ईर्ष्या वाटत होती. एवढेच नाही, तर एका मुलावरूनही त्यांच्यात वाद सुरू होता. यामुळेच तिने आपल्या मैत्रिणीला विद्रूप करण्याची योजना आखली. सध्या पोलिसांनी या प्रकरणी एक तरुण आणि एक तरुणीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीबीए शिकत असलेली २३ वर्षीय श्रद्धा दास आणि अभियांत्रिकीची विद्यार्थिनी असलेली २१ वर्षीय इशिता साहू या दोघी एकेमकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. पण, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात बोलणे बंद झाले होते. श्रद्धा दास ही दिसायला अतिशय सुंदर होती, तिला नुकतीच नोकरी लागली होती. तिच्याकडे महागडा फोन आणि आलिशान जीवनशैली होती. हे सर्व पाहून इशिताच्या मनात हळूहळू तिच्याविषयी ईर्ष्येची भावना वाढू लागली. या दरम्यानच दोघींच्या आयुष्यात एका मुलाची एन्ट्री झाल्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले.

कसा केला प्लॅन?

श्रद्धा दास दिसायला सुंदर होती त्यामुळे इशिताच्या मनात तिच्याबद्दल मत्सर निर्माण होऊ लागला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून इशिताने श्रद्धाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इशिताने या घटनेची योजना सुमारे १५ दिवस आधीच आखली होती. तिने गूगलवर चेहरा खराब करण्यासाठी विविध कल्पना शोधल्या. शेवटी तिने ॲसिडने चेहरा विद्रूप करण्याची पद्धत निवडली. इशिताने तिचा ओळखीचा मित्र अंश शर्मा याच्या मदतीने कॉलेजच्या बनावट लेटरहेड आणि कॉलेजच्या शिक्क्याचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ती सिविक सेंटरमधील एका दुकानात पोहोचली, जिथे दुकानदाराने सुरुवातीला ॲसिड देण्यास नकार दिला, कारण त्याला कागदपत्रांवर काही संशय आला होता. त्यावेळी अंशनने फोनवरून स्वतःला एका खासगी कॉलेजचा प्राध्यापक सांगून इशिताला ॲसिड देण्यास सांगितले.

श्रद्धाचा ५०% चेहरा भाजला!
घटनेच्या दिवशी इशिताने सरप्राइज देण्याच्या बहाण्याने श्रद्धाला घराबाहेर बोलावले. मात्र, श्रद्धाने नकार दिल्यावर, इशिता फिरायला जाण्याचा हट्ट करू लागली. मात्र, श्रद्धाने पुन्हा नकार दिला, तेव्हा इशिताने 'सरप्राईज दाखवते' असे सांगून एका जारमधून ॲसिड काढून तिच्या चेहऱ्यावर फेकले. यात श्रद्धाचा सुमारे ५०% चेहरा भाजला असून, तिला गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मानसिकदृष्ट्या त्रस्त होती इशिता!
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी इशिता साहू आणि तिचा सहकारी अंश शर्मा यांना अटक केली आहे. चौकशीत अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. इशिताची आई सरिता साहू यांनी सांगितले की, इशिता गेल्या अनेक दिवसांपासून मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. त्यांनी मुलीवर उपचारही केले होते. एवढेच नाही, तर इशिताने आईला जीवे मारण्याची धमकीही दिली होती आणि स्वतः आत्महत्या करण्याचीही भाषा केली होती, ज्यामुळे आई खूपच चिंतेत होती. आता या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.