कर्करोगामुळे तरुणाने लिंग गमावले. अन् डॉक्टरांनी अशी केली कमाल की ....
नागपूर : मध्य भारतातील आरोग्याचे हब म्हणून नागपूर पुढे येत आहे. त्यानुसार नागपुरात नवनवीन गुंतागुंतीच्या आधुनिक पद्धतीच्या शस्त्रक्रिया उपलब्ध झाल्या आहे. त्यामुळे मध्य भारतातील रुग्णांना आता मेट्रो शहरातील रुग्णालयांत जाण्याची गरज नाही.
दरम्यान एका तरुणाने कर्करोगामुळे आठ वर्षांपूर्वी लिंग गमावले होते. परंतु नागपुरातील डॉक्टरांनी कमाल केल्याने या रुग्णाच्या आयुष्यात काय परिवर्तन झाले? ते आपण बघू या.
राजस्थानचा सहिवासी असलेल्या एका तरुणाला कर्करोग झाला. या आजारामुळे त्याला सुमारे आठ वर्षांपूर्वी लिंगच गमवावे लागले. त्यानंतर त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत होता. दरम्यान त्याला नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जनच्या चमूबाबतची माहिती कळाली. त्यानंतर तो उपचारासाठी या रुग्णालयात आला. लता मंगेशकर रुग्णालयात या तरुणाचे लिंग गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून एकाच टप्प्यात कृत्रिम लिंग तयार करून ते शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा लावण्यात आले.
मध्य भारतातील या पद्धतीची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे. ही संपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या चमूला पूर्ण करण्यासाठी तब्बल ९.५ तास लागले. डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल, डॉ.अभिराम मुंडले, डॉ. कंवरबीर, डॉ. पल्लवी या चमूने ही कामगिरी पार पाडली. डॉ. अंजली भुरे, डॉ. मधुश्री शहा, डॉ. केतकी मारोडकर, डॉ. रचना नैताम, डॉ. गुंजन यांनी या प्रक्रियेसाठी बधिरीकरणाचे काम केले. वैद्यकीय अधिक्षक व उपअधिष्ठाता डॉ. नितीन देवस्थळे यांनी रुग्णालय स्तरावरील सर्व मदत केली. शस्त्रक्रियेतून रुग्ण पूर्ण बरा झाला आहे. आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या सरकारी योजनांतर्गत हिंगणा येथील लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपचार व शस्त्रक्रिया नि:शुल्क केली जाते.
शस्त्रक्रियेत काय झाले…
तरुण रुग्णाच्या लिंगाच्या रचनेसाठी, रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्ग (मूत्रमार्गाची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली. त्यानंतर जघन भागात लावण्यात आले. लिंगात रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा समावेश या शस्त्रक्रियेमध्ये होता. अशा शस्त्रक्रियांना मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया म्हणतात. यासाठी आवश्यक असलेला अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. कर्करोगाव्यतिरिक्त अशा पुनर्रचनात्मक प्रक्रिया, ट्रॉमाटिक (अपघाती) लिंग विच्छेदन आणि लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया (लिंग बदल शस्त्रक्रिया) असलेल्या रुग्णांसाठी या सुविधा फायदेशीर ठरू शकतात.
नागपुरात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
नागपुरात विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढत असून नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या शस्त्रक्रियाही यशस्वी होत आहे. लता मंगेशकर रुग्णालयातही प्लास्टिक सर्जरी विभागाने मध्य भारतातील पहिली कृत्रिम लिंग बसवण्याची शस्त्रक्रिया केली. असे लता मंगेशकर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.