चक्क शेती चोरीला गेली? गोपीचंद पडळकरांच्या भावावर शेतकरी आजींचे गंभीर आरोप, विधानभवानाबाहेर आक्रोश!
महाराष्ट्राच्या सध्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडवली आहे. जत तालुक्यातील ८२ वर्षीय शेतकरी आजी विठाबाई पडळकर यांच्या १७ एकर जमिनीवर डोळा ठेवून त्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
याप्रकरणी जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यावर थेट आरोप शेतकरी आजी विठाबाई यांनी केले आहेत. विधानभवनाबाहेर या शेतकरी कुटुंबाने आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे.
आजीच्या जमिनीवर डोळा!
विठाबाई पडळकर या ८२ वर्षीय शेतकरी आजी आपल्या १७ एकर जमिनीसाठी लढत आहेत. त्यांच्या नातवाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "गोपीचंद पडळकर, त्यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर आणि इतर काही व्यक्तींनी संगनमताने ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. विठाबाई यांना पेन्शन सुरू करून देण्याच्या बहाण्याने कागदपत्रांवर अंगठे घेण्यात आले, मात्र जमीन विक्रीबाबत त्यांना काहीही विचारण्यात आले नाही. विशेष म्हणजे, या व्यवहारात त्यांना कोणताही आर्थिक मोबदला मिळाला नाही. तक्रार दाखल झाल्यावर पाच लाख रुपये पाठवण्यात आले, परंतु आम्हाला हे पैसे नको, आम्हाला जमीन विकायची नाही".
या प्रकरणात फार्महाऊसच्या मॅनेजरच्या नावावर जमीन नोंदवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील आजीच्या नातवाने केला आहे.
राजकीय दबाव आणि न्यायाची लढाई
विठाबाई यांनी सांगितले की, "आम्ही सर्व स्तरांवर तक्रारी दाखल केल्या, परंतु त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही. मंडळ अधिकाऱ्यांनी राजकीय दबावामुळे योग्य कारवाई केली नाही. सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. मात्र, या लढाईत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे."
विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचा आक्रोश
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनाबाहेर विठाबाई आणि त्यांच्या कुटुंबाने आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, गोपीचंद पडळकर यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जमिनीचा प्रश्न
या प्रकरणात गोपीचंद पडळकर यांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. त्यांची भूमिका आल्यानंतर या प्रकरणाच्या दोन्ही बाजू स्पष्ट होतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.