सांगली :- हर्षल पाटील कंत्राटदारच, मंत्री गुलाबराव पाटलांसह सांगली जिल्हा परिषद तोंडावर पडली; एका कोनशिलेमुळे सत्य समोर आलं
सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील याने आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. जलजीवन मिशनच्या कामाची बिले सरकारने न काढल्याने त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. पण या प्रकरणात राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेने हात वर करत हर्षल पाटील एक रुपायाही देणे नसल्याचे म्हंटले आहे. जिल्हा परिषदेनेही हर्षल पाटीलसोबत करारनामा नसल्याचे सांगितले आहे. पण आता याच प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेकडूनच मूळ कंत्राटदारांचे देयकेच दिलेली नसल्याचे उघड झाले आहे. यामुळेच हर्षल पाटील याला त्याच्या कामाचे पैसै मिळाले नाहीत आणि त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेकडून होताना दिसत आहे.
सरकार आणि जिल्हा परिषद यांनी हर्षद पाटील हा कंत्राटदार नव्हताच असा पवित्रा घेतला आहे. पण सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाच्या कोनशिलेवर हर्षद पाटील आणि अक्षय पाटील या दोन ठेकेदारांचीच नावे आहेत. अक्षय पाटील हा मूळ ठेकेदार असून हर्षद पाटील याचा भाऊ आहे. हे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.हर्षद पाटील याने वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी, कणेगाव, मालेवाडी, आहिरवाडी आणि शिराळा तालुक्यातील पं.त.वारूण आणि चिंचोली या गावात जल जीवन मिशन अंतर्गत कामे केली आहेत. हर्षद पाटील यांनी स्वत:च्या तांदुळवाडी आणि मालेवाडी या गावातील कामे सी. एस. पाटील या मूळ कंत्राटदाराकडून उपकंत्राटदार म्हणून केले. ही दोन्ही कामे पूर्ण झाली आहेत. कणेगाव येथील काम त्याने जुबेर इनामदार यांच्याकडून घेतले होते. तेथे 100 टक्के पूर्ण झाले आहे. पण वाळवा तालुक्यातील आहिरवाडी येथील डोंगराई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., शिराळा येथील पं.त.वारूण येथील काम अनुक्रमे 80 आणि 90 टक्के पूर्ण झाले आहे.
राज्य सरकारने या कामांची निविदा काढत 9 कोटी 67 लाख 93 हजारात कामे दिली होती. या कामाच्या पोटी शासनाने मूळ कंत्राटदारांना 6 कोटी 94 लाख 18 हजारांची रक्कम दिली आहे. पण जवळपास 1 कोटी 73 लाख 75 हजारांची रक्कम अद्याप देणे बाकी आहे. ज्यात हर्षद पाटील याच्या कामाची रक्कम 1 कोटी 47 लाखांची आहे.
जर जिल्हा परिषदेनं मूळ कंत्राटदार यांची रखडलेली जवळपास 1 कोटी 73 लाख 75 हजारांची रक्कम दिली असती तर हा अनर्थ टळला असता. मुळात शासनाकडूनच देय मिळाले असते तर त्यातून हर्षद पाटील याच्या कामाचे देय देता आले असते आणि त्याचे 65 लाखांपेक्षा जास्त रक्कमेचं कर्ज फिटले असते. त्याचा जीव वाचला असता, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
कंत्राटदार मुर्ख आहे का?
या प्रकरणामुळे राज्यातील कंत्राटदार संघटना आक्रमक झाली असून सरकारला धारेवर धरले जात आहे. याआधी देखील हाच मुद्दा जयंत पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित करत राज्य सरकारने कंत्राटदारांचे देय द्यावेत अन्यथा त्यांना आत्महत्या कराव्या लागतील असा इशारा दिला होता. आता अधिवेशन संपून आठ दिवसही होत नाही. तोच सांगलीतील कंत्राटदाराने जीवन संपवले, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.