Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पनवेलच्या उपनिरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

पनवेलच्या उपनिरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
 

पनवेल:  पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (वर्ग-२) सचिन वामन वाईकर याला सोमवारी रात्री साडेदहा वाजता ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अटक केली. तक्रारदाराच्या वडीलांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यामध्ये कलम वाढविण्याची तसेच जामीन नामंजूर करण्याची भीती तक्रारदाराला उपनिरीक्षक वाईकर घालत होता. सुरूवातीला एक लाख रुपयांची मागणी वायकरने तक्रारदाराकडे केली होती. त्यानंतर पन्नास हजार घेण्याचे सोमवारी ठरले.

रायगड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे उपअधीक्षक सरीता भोसले यांच्यासह पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारदारांच्या वडिलांविरोधातील जमीनीच्या सातबाराच्या नोंदी संदर्भातील एक प्रकरण दाखल होते. संबंधित गुन्हा दाखल झाल्यावर उपनिरीक्षक वाईकर याने तपासादरम्यान संशयीत आरोपींकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले होते. त्यामुळे अखेर तक्रारदाराला लाच लुचपत प्रतिबंधक पोलिसांकडे धाव घेण्याची वेळ आली.

सोमवारी पुन्हा एकदा उपनिरीक्षक वाईकर याने अटक न करण्यासाठी, गंभीर कलम न वाढवून अटक करण्याची भिती दाखवली होती. यामुळे उपनिरिक्षक वाईकर याने लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक पोलिसांनी पनवेल शहरातील उरणफाटा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर पंचासमोर उपनिरीक्षक वाईकर याने केलेल्या लाचेच्या मागणीची खातरजमा केली.

या पडताळणीमध्ये सुरूवातीला उपनिरीक्षक वाईकर याने १ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्विकारण्याचे ठरले. लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यावर रात्री साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लाचेची रक्कम घेण्यासाठी उपनिरीक्षक वाईकर यांनी आपल्या खासगी मोटारीतून खाजगी व्यक्ती रविंद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे (रा. करंजाडे) याच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारली. तातडीने पोलिसांनी त्याला पकडले. कारवाईवेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, महेश पाटील, आणि पोलीस शिपाई नवदीत नांदगांवकर हे उपस्थित होते.

कोणत्याही लाचखोरीच्या प्रकाराबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ टोल फ्री – १०६४, दूरध्वनी ०२२- २०८१३५९८/ २०८१३५९९, व्हॉट्सअ‍ॅप – ९९३०९९७७००, संकेतस्थळ – achmaharashtra.net, ईमेल: spachthane@mahapolice.gov.in यावर संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक शिवराज पाटील यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.