Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स

भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स


जगभरात मेड इन इंडिया आयफोनची बोलबाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही तणावात आहेत, पण आता यावरून चीनला पोटदुखी झाली आहे. भारतात आयफोनचं उत्पादन वाढवण्याच्या अॅपलच्या योजनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

फॉक्सकॉननं आपल्या भारतातील आयफोन प्लांटमधून शेकडो चिनी अभियंतं आणि टेक्निशिअन्सना परत बोलावलं आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, दक्षिण भारतातील फॉक्सकॉनच्या आयफोन प्लांटमधील बहुतेक चिनी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी परत येण्यास सांगण्यात आलं होतं. आतापर्यंत ३०० हून अधिक चिनी कर्मचाऱ्यांनी भारत सोडलाय. या प्रकल्पांमधील कामकाज सध्या तैवानचे सहाय्यक कर्मचारी हाताळत आहेत.

भारतात आयफोन निर्मितीची स्थिती

फॉक्सकॉनच्या दक्षिण भारतातील प्लांटमध्ये भारतात तयार होणारे सर्वाधिक आयफोन असेंबल केले जातात. फॉक्सकॉन किंवा अॅपलकडून या निर्णयावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु असं सांगण्यात आलंय की या वर्षाच्या सुरुवातीला चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियामक एजन्सी आणि स्थानिक सरकारांना भारत आणि आग्नेय आशियातील तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उपकरणांची निर्यात थांबविण्यास सांगितलं होतं. चीनमधून उत्पादनाचं स्थलांतर थांबवणं हे यामागचे उद्दिष्ट असू शकतं. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी यापूर्वीच चिनी असेंब्ली कामगारांच्या कौशल्याचे कौतुक केलं आहे.

भारतातील प्रभाव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी कामगारांच्या माघारीमुळे स्थानिक कामगारांचं प्रशिक्षण आणि उत्पादन तंत्रज्ञान हस्तांतरित होण्यास उशीर होऊ शकतो. यामुळे उत्पादनाच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे भारतातील उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नसून असेंब्ली लाइनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.

अॅपल पुढील वर्षापासून अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयफोन भारतात असेंबल करण्याची योजना आखत आहे. सध्या अॅपलचा एकही स्मार्टफोन अमेरिकेत बनलेला नाही. बहुतेक आयफोन चीनमध्ये बनवले जातात, तर भारत दरवर्षी सुमारे ४ कोटी युनिट्स (जागतिक उत्पादनाच्या १५%) तयार करतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.