Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मित्राला आणू नको म्हटल्यावर संघाच्या शाखेत जाणं का बंद केलं? असे होते अभिनयापलीकडचे निळू फुले

मित्राला आणू नको म्हटल्यावर संघाच्या शाखेत जाणं का बंद केलं? असे होते अभिनयापलीकडचे निळू फुले
 

काही वर्षांपूर्वी आलेलं हे गाणं... 'निळूभाऊंची भलतीच शान' असं म्हणत आपण ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना या गाण्याच्या माध्यमातून आदरांजली देतोय, असं कदाचित गाणं लिहिणाऱ्याला, सादर करणाऱ्याला वाटलं असेल. पण पन्नास वर्षं लोकनाट्यं ते व्यावसायिक रंगभूमी, मराठी-हिंदी सिनेमांमध्ये बहुरंगी-बहुढंगी भूमिका साकारणाऱ्या, अभिनयाचा प्रचंड आवाका असलेल्या या कलाकाराला आपण केवळ एका ठराविक चौकटीत अडकवतोय, याचं भान मात्र राहिलं नाही. त्यातही जो डायलॉग निळू भाऊ कधी, कोणत्या सिनेमात बोलले आहेत हे कोणालाच आठवत नाही, त्या एका ओळीपुरती त्यांची ओळख मर्यादित केली गेली. अभिनेता म्हणून त्यांची 'रेंज' खूप खूप जास्त होती. त्याहीपेक्षा माणूस म्हणून त्यांची उंची मोठी होती.

सर्वसामान्यांमध्ये रमणारा, लोहियांच्या विचारांना आदर्श मानणारा, कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधन करणारा, पडद्यामागच्या कलावंतांच्या अडीअडचणीला धावून जाणारा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणारा असा हा मोठ्या मनाचा 'कार्यकर्ता' माणूस होता. आज (13 जुलै) निळू फुले यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने अभिनयासोबतच निळूभाऊंच्या राजकीय-सामाजिक-वैचारिक वाटचालीचाही धांडोळा घेऊ. नीलकंठ कृष्णाजी फुले असं संपूर्ण नाव असलेल्या निळू भाऊंचा जन्म सासवड तालुक्यातल्या खळदखानवली गावात झाला. नाव नीलकंठ असलं तरी घरातल्यांसाठी आणि नंतर अवघ्या महाराष्ट्रासाठीही ते निळू-निळूभाऊच होते.  चं. प्र देशपांडे यांनी त्यांच्या एका लेखात म्हटलं आहे की, नीलकंठचा नीलकंठरावही झाला नाही आणि नीलकंठही, एखाद्या नीलकंठचा 'निळू' होण्याची अनेक कारणं असतात. पण इथं मात्र सामान्य माणसातला सामान्यपणा आणि प्रेम यांचा मिलाफ हेच कारण आहे. पुण्यातल्या खडकमाळ आळीत फुले कुटुंबाचं घर होतं. सहा भाऊ आणि चार बहिणी असं चांगलं 'थोरलं' कुटुंब. वडीलांचं लोखंडी सामानाचं एक लहानसं दुकान होतं. पण परिस्थिती तशी बेताचीच.
निळू फुले यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, घरातल्या प्रत्येकालाच कष्ट करणं आवश्यक होतं. निळू फुलेंचे काका हे रेल्वेत नोकरीला होते. ते मध्य प्रदेशात होते. घरातल्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या काकांकडेच ठेवलं होतं. तिथे त्यांचं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर पुण्याला शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये पुढचं शिक्षण घेतलं. "विद्यार्थी म्हणून मी ढ होतो. मॅट्रिकही पूर्ण केलं नाही. मराठी सोडून मला इतर विषय फार आवडायचे नाहीत. शांताबाई शेळके या माझ्या मराठीच्या शिक्षिका होत्या. त्या आम्हाला मराठीव्यतिरिक्त इंग्रजी आणि इतर भाषांतल्या कथा सांगायच्या. 'गॉन विथ द विंड'सारख्या उत्तमोत्तम सिनेमांबद्दल सांगायच्या. त्यातून वाचन वाढत गेलं, चांगल्या कलाकृती पाहिल्या," असं निळू फुलेंनी सह्याद्री वाहिनीच्या मुलाखतीत म्हटलं आहे.

निळूभाऊंनी शालेय शिक्षण सोडलं असलं तरी घरच्या परिस्थितीमुळे अर्थार्जन करणं गरजेचं होतं. त्यामुळे निळूभाऊंनी माळीकामाचा कोर्स केला. दरम्यान, शाळेत असतानाच ते राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले. सुरुवातीला संघाच्या शाखेत गेलेले निळू फुले त्यानंतर आजन्म राष्ट्र सेवा दलाशी कसे जोडलेले राहिले, याचा किस्साही रंजक आहे. आपल्या मित्रांसोबतच निळूभाऊ जवळच असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला लागले. त्यामागे काही विचार वगैरे नव्हता तर तिथे मित्रांसोबत खेळायला मिळतंय एवढीच भावना होती.
त्यांच्यासोबत त्यांचे इब्राहिम, आव्हाड वगैरे मित्रही तिथे जायचे. काही दिवस गेल्यानंतर तिथल्या लोकांनी निळू फुलेंना सांगितलं की, त्यांनी त्यांच्या दलित-मुस्लीम मित्रांना तिथे घेऊन येऊ नये. आपले मित्र जिथं आलेलं चालत नाहीत, तिथं कशाला जायचं, असा विचार त्यांनी केला आणि संघाच्या शाखेत जाणं बंद केलं. त्याचदरम्यान त्यांच्या शाळेजवळच राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरू झाली. निळू भाऊ तिथे जाऊ लागले. पण संघातला अनुभव असल्याने त्यांनी विचारलं की, माझे काही ख्रिश्चन, मुस्लीम सोबती आले तर चालतील का? तेव्हा त्यांना उत्तर मिळालं की, सेवादलात सगळ्या जाती-धर्माच्या मुलांना प्रवेश आहे. धर्मनिरपेक्षतेचा पहिला धडा गिरवत त्यांचा सेवादलासोबतचा प्रवास सुरू झाला.





सेवादल ते संयुक्त समाजवादी पक्ष, राजकारणाचा विचार

सेवादलातच त्यांच्यावर आंदोलन, चळवळीचे संस्कार झाले. पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून झालेली चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्रामाचा लढा यांमध्ये निळूभाऊ सहभागी झाले होते. एखादी गोष्ट थेट सांगणं आणि कलेच्या माध्यमातून सांगणं यात फरक असतो. त्यामुळे सेवादलात कला पथकाची स्थापना करण्यात आली होती. निळू भाऊ या कला पथकात सक्रीय होते. पुण्यातल्या कलापथकाची जबाबदारी निळू फुलेंनीच घेतली होती.

याच दरम्यान निळू फुलेंना डॉ. राममनोहर लोहियांची ओळख झाली. त्यांच्या विचारांनी, मुद्देसूद मांडणीने ते प्रभावित झाले होते. राष्ट्र सेवादलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केलं. दरम्यान, समाजवादी पक्ष फुटला. डॉ. लोहियांना मानणारे लोक संयुक्त समाजवादी पक्षात गेले. त्यामुळे, निळूभाऊही सेवा दलाच्या सक्रिय कामापासून दूर गेले.

दरम्यान, हा तोच काळ होता जेव्हा निळू फुले पूर्ण वेळ राजकारणात जाण्याचा विचार करत होते. "याच मार्गाने जायचं हे माझं निश्चित होतं. मी घरीही ते सांगितलं होतं. घरातली भावंड मार्गी लागली की नोकरी सोडून राजकारण करावं हे निश्चित होतं," असं निळू फुलेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यावेळी ते आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये हेड माळी म्हणून काम करत होते. या कॉलेजचा जो बगिचा आहे, तो मी तयार केलाय हे ते अभिमानाने सांगायचे. निळू भाऊंनी काही काळाने ही नोकरी सोडली खरी, पण ते राजकारणात गेले नाहीत, तर रंगमंचावर पोहोचले.

कलापथक, लोकनाट्यं ते नाटक

सेवादलात असतानाच ते कला पथकात कार्यरत होते. त्यावेळी ते छोटीछोटी नाटकं बसवायचे आणि त्यातून पाच रुपये-सात रुपये मिळायचे. ते पण सेवा दलाला दिले जायचे, अशी आठवण निळू भाऊंनी सांगितली होती. या कलापथकाची भूमिका संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खूप महत्त्वाची राहिली. लोकांना जमवण्यासाठी, त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या नाटकांचा उपयोग व्हायचा.

कला पथकाद्वारे निळू फुलेंनी महाराष्ट्राच्या विविध भागाचा दौराही केला होता. या चळवळीत राम नगरकर, दादा कोंडके, वसंत बापट, लीलाधर हेगडे हेही निळूभाऊंसोबत काम करत होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपली, आंदोलन यशस्वी झालं. यात सेवादलाच्या कलापथकाची कामगिरी महत्त्वाची ठरली. लोकजागरणासोबतच त्यातून रंजनाचं कामही झालं. कलापथकाचे संघटक म्हणून कलाकारांना गोळा करण्यापासून नाटकाच्या निवडीपर्यंत अनेक कामं ते करत.

'पुढारी पाहिजे' हे पु. ल. देशपांडेंचं कलापथकाने सादर केलेलं नाटक याच काळात गाजलं होतं.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर 'महाराष्ट्र दर्शन'चा एक कार्यक्रम शाहीर वसंत बापट, शाहीर लीलाधर हेगडे यांनी बसवला होता. निळू फुले, राम नगरकरांसह अनेक दिग्गज त्यात होते. या कार्यक्रमाच्या दरम्यानच निळू फुलेंनी 'कथा अकलेच्या कांद्या'ची या लोकनाट्याचा प्रयोग करायला घेतला. लेखक शंकर पाटलांनी मूळ कथेचं रुपांतर नाटकात केलं.

या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचीही गंमतच झाली. सांगलीला होणारा या नाटकाचा पहिला प्रयोग सपशेल पडला. ना हशा, ना टाळ्या. वेळही लांबलेली. काय चुकलं हे शोधण्यासाठी निळू फुले, लीला गांधी, राम नगरकर हे सगळे रात्रभर एकत्र बसले. निळू भाऊंनी शंकर पाटलांच्या संहितेत बरीच काटछाट करत एडिटिंग केलं. नव्या संहितेचा प्रयोग दुसरा प्रयोग लोकांनी डोक्यावर घेतला आणि 'कथा' धो धो चालू लागलं. रजनीश जोशी यांच्या 'जनामनातला माणूस' या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे.

त्यानंतर निळू फुलेंनी अनेक लोकनाट्यं केली. 'बिन बियांचं झाड', 'कुणाचा कोणाला मेळ नाही', 'मास्तर एके मास्तर', 'येरा गबाळाचे काम नोहे', 'भलताच बैदा झाला', 'माझी मेहुणी, माझी बायको, लवंगी मिरची मी कोल्हापुरची' एकापाठोपाठ एक यशस्वी लोकनाट्यांची मालिका सुरू झाली. याच दरम्यान त्यांच्याकडे व्यावसायिक रंगभूमीवरचं एक असं नाटक आलं, जे अभिनेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीसाठीच महत्त्वाचं ठरलंच, पण मराठी रंगभूमीवरही वादळ घेऊन आलं. नाटक होतं विजय तेंडुलकरांचं 'सखाराम बाइंडर.'

सखाराम बाइंडर

रंगभूमीवर इतिहास घडवणारी ही व्यक्तिरेखा तुमच्यापर्यंत आली कशी, या प्रश्नाचं प्रांजळपणे उत्तर देताना त्यांनी म्हटलं होतं की, इतरांनी नाकारली म्हणून. "ही व्यक्तिरेखा डॉ. काशिनाथ घाणेकरांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. पण त्यांनी ती काही कारणांनी नाकारली. माझ्या माहितीप्रमाणे नंतर डॉक्टर लागूंनाही 'बाइंडर'साठी विचारलं होतं. नंतर ती माझ्याकडे आली. तोपर्यंत मी ग्रामीण बाजाची लोकनाट्यंच केली होती."

त्या नाटकातच एक ताकद होती, असं ते सांगतात.

सखाराम हा ब्राह्मण होता, तोंडात शिव्या असल्या तरी त्याची भाषा ब्राह्मणी होती. त्याला व्यसनं होती. बाई आणि पुरूष यांच्यातलं नातं, लैंगिक व्यवहार याबद्दल विचार करण्याची त्याची विशिष्ट पद्धत होती. असा हा सखाराम दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी आपल्याकडून घोटून घेतला, असं निळू फुले सांगतात. पण त्यांनी स्वतःही अशा काही शैलीत साकारला की, आजही त्यांच्याशिवाय बाइंडरची कल्पनाही करता येणार नाही.

डॉ. श्रीराम लागू यांनी जेव्हा बाइंडरचा प्रयोग पाहिला, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, "निळू भाऊंचा सखाराम हा मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाविष्कारांपैकी एक होता. केवळ भारतीयच नाही तर जागतिक रंगभूमीवरचं हे माझं आवडतं नाटक. ते दिग्दर्शित करण्याची माझी खूप इच्छा होती, पण ती सफल न झाल्याने मी अढी मनात घेऊनच प्रयोगाला आलो होतो. निळूभाऊ उत्तम काम करणार याबद्दल शंका नव्हती, पण निळूभाऊंचा सखाराम मनात-डोळ्यांत न मावण्याइतका अक्राळ-विक्राळ होऊन उभा राहिला तेव्हा अगदी अभावितपणे त्यांचे पाय धरावेसे वाटले."

एका कलाकारासाठी याहून मोठी दाद काय असू शकते. त्यानंतर निळू भाऊंनी तेंडुलकरांचेच 'बेबी' हे नाटक, जयवंत दळवींचं 'सूर्यास्त', 'जंगली कबूतर', 'राजकारण गेलं चुलीत' यांसारखी नाटकं केली. सखाराम आणि निळू फुले हे नातं घट्ट असलं तरी स्वतः निळू फुलेंना 'बेबी' नाटकातली राघवची भूमिका प्रचंड आवडायची. आपल्या बहिणीसाठी गल्लीतल्या दादासोबत वैर पत्करून तुरुंगात गेलेला राघव परत येतो आणि बहिणीला त्याच दादाची ठेवलेली बाई म्हणून पाहतो, तेव्हा तुटून जातो. त्याची घालमेल अस्वस्थ करणारी होती. या नाटकाची नायिका लालन सारंग होत्या.

"या नाटकाचे ऐंशी प्रयोग झाले. राघव बहिणीसमोर आपल्या सगळ्या भावना बोलून दाखवण्याच्या प्रसंगात प्रत्येक प्रयोगाला लालन रडायची," अशी आठवण निळू फुलेंनी सांगितली होती. रंगभूमीवरच भावनांचे एवढे वेगवेगळे आविष्कार दाखवणाऱ्या भूमिका साकारत असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांची सिनेमातील कारकिर्दही बहरत होती.

कपटी, बेरकी खलनायकापेक्षाही बरंच काही...

निळू फुलेंची सिनेमातली कारकिर्द अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडीपासून सुरू झाली. यामध्ये त्यांनी गावच्या पाटलाचे हस्तक असलेल्या इरसाल झेले अण्णांची भूमिका केली. ती इतकी गाजली की, कोल्हापूरात त्याकाळी 'झेले अण्णा' रिक्षा फिरायच्या. निळू फुलेंनी त्यानंतर जवळपास दोनशेहून अधिक मराठी चित्रपटांत भूमिका केल्या. पण डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि तोंडाचा चंबू करून बेरकीपणानं हुंकारत बोलणाऱ्या सरपंच, पाटील, भ्रष्ट नेत्याच्याच प्रतिमेत अनेकांनी त्यांना अडकवलं.

त्यांचा खलनायक इतका प्रभावी होता की, महिला त्यांच्या नावाने बोटं मोडतं. खरंतर त्यांनी एकाहून एक सरस भूमिका मराठी सिनेमात साकारल्या आहेत. पण काही भूमिकांचा विशेष उल्लेख करावा लागतो. त्यांपैकीच एक म्हणजे 'सामना' सिनेमातला हिंदुराव. अमर्याद सत्ता आणि त्यातून आलेला माज दाखवणारा पुढारी हिंदुराव धोंडे-पाटील आणि दुसरीकडे कोणताही आगापिछा नसलेला एक साधा मास्तर...कोणतेही प्रश्न विचारायला न कचरणारा... हिंदुरावचा अल्टर इगो असल्यालासारखा. या दोन प्रवृत्तींचा संघर्ष म्हणजे सामना आणि तो रंगवला निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांनी. विशेष म्हणजे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आधी आपले कलाकार निवडले आणि मग सिनेमाची कथा रचली गेली. निळू फुले आणि डॉ. लागूंना घेऊन सिनेमा करायचा आहे, असं जब्बार यांनी विजय तेंडुलकरांना सांगितलं आणि त्यानंतर तेंडुलकरांनी सामनाची कथा लिहिली.

'सामना'नंतर डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबत निळू फुलेंनी 'सिंहासन' सारखा राजकीय सिनेमाही केला. पण तिथं जब्बार यांनी निळू फुलेंना राजकारण्यांपैकी एक न बनवता या सगळ्या राजकारणाचा साक्षीदार असलेला पत्रकार दिगू टिपणीसचा रोल दिला. सिनेमाच्या शेवटी दिगूची वेडसरपणाच्या पातळीवर गेलेली हताशा हा निळू भाऊंच्या अभिनयाचा आणि सिनेमाचा हाय पॉइंट म्हणता येईल.

शापित सिनेमातला दलित, चोरीचा मामलामधला हातगाडीवाला, पोरींची कमाल, बापाची धमालमधला चार पोरींचा कावलेला बाप, पिंजरामधला सोंगाड्या, जैत रे जैतमधला आदिवासी भगत, माझा पती करोडपतीमधला लक्ष्मीधर कुबेर ते अगदी अलीकडच्या काळातल्या गोष्ट छोटी डोंगराएवढीमधला म्हातारा अशा कितीतरी वेगवेगळ्या भूमिका निळू फुलेंनी अविस्मरणीय केल्या आहेत.

हिंदीतही त्यांनी कुली, मशाल, वह सात दिन सारख्या सिनेमातून आपली छाप सोडणारे रोल केले. निळू फुलेंनी सासुरवाशीण नावाचा सिनेमा केला होता. यात त्यांची खलनायकाची भूमिका होती. हा सिनेमा हिंदीत 'सौ दिन साँस के' बनणार होता आणि निळू फुलेंचा रोल प्राण करणार होते. हिंदी सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांचीही विशेष भूमिका होती.

अशोक कुमार यांनी मूळ मराठी सिनेमा पाहिला होता. त्यांनी प्राण यांना सांगितलं की, 'मराठीत निळू फुलेंनी ज्या पद्धतीने भूमिका केली आहे, त्यापेक्षा अधिक चांगली तू करू शकणार नाहीस. हा रोल हिंदीतही त्यांनाच करू दे.' विशेष म्हणजे प्राण यांनीही हे ऐकलं. निळू फुलेंनी किती, कोणत्या, भूमिका केल्या हे सांगण्यापेक्षा त्यांनी काय ताकदीने केल्या हे सांगण्यासाठी हा किस्साही पुरेसा आहे.

मुखवट्यामागचा सच्चा माणूस

एवढं अमाप यश आणि लोकप्रियता मिळूनही निळू फुले यांचे पाय कायम जमिनीवरच राहिले. सामान्यांशी त्यांची नाळ तुटली नाही. किल्लारीच्या भूकंपानंतर ते भूकंपग्रस्तांच्या मदतीला धावले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संस्थेच्या कामाला त्यांनी सहकार्य केलं होतं. नाटकाच्या दौऱ्यावर गेल्यावर त्यांना अनेक कार्यकर्ते, समस्याग्रस्त कलावंत भेटायचे. बिकट आर्थिक स्थितीत ही मंडळी काम करायची. निळूभाऊ त्यांना वैयक्तिक पातळीवर मदत करायचे. पण एकट्याच्या जीवावर किती गोष्टी साध्य होणार. त्यातूनच सामाजिक कृतज्ञता निधीची संकल्पना समोर आली.

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत नाटकाचे प्रयोग करायचे आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेच्या व्याजातून गरीब कलावंतांना मदत करायची. डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू इत्यादींनी या कल्पनेला आकार दिला. आचार्य अत्रे यांच्या 'लग्नाची बेडी' या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग झाले. अभिनेत्री तनुजा, निळू फुले, डॉ. लागू, सदाशिव अमरापूरकर, सुहास जोशी असे अनेक कलाकार यामध्ये होते. या नाटकाच्या प्रयोगातून एक कोटींची रक्कम उभी राहिली.

नाकारलेला 'महाराष्ट्र भूषण'
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 2003 या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निळू फुले यांची निवड झाल्याचं त्यांना कळविण्यात आलं होतं. निळूभाऊंनी त्यांचे आभार मानले, पण हा पुरस्कार नाकारला. मी व्यावसायिक अभिनेता आहे, जे काम करतो त्याचा मोबदला घेतो. यात समाजासाठी काही केलं नाहीये. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाच दिला जावा, असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्चच्या माध्यमातून काम करणाऱ्या . राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांचं नावही सुचवलं. विशेष म्हणजे विलासरावांनीही त्यांची ही विनंती स्वीकारली.

कुटुंबात रमणारे निळूभाऊ

नाटकांचे दौरे, सिनेमांचं शूटिंग, सामाजिक कार्य यांमध्ये प्रचंड बिझी असलेले निळू फुले आपल्या कुटुंबात, छंदांमध्ये, शेतीतही तितकाच वेळ काढून रमायचे. त्यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी बीबीसी मराठीशी त्यांची आठवण सांगताना म्हटलं की, "बाबाने माझा प्रत्येक वाढदिवस कधी चुकवला नाही. कुठेही शूट असलं तरी तो 18 ऑक्टोबरला सुट्टी घेऊन माझ्यासाठी यायचाच. त्याचबरोबर प्रत्येक दिवाळीची आणि मे महिन्याची सुट्टी आम्ही फिरायला जायचो. अख्खा भारत त्याने मला फिरवला आहे. मी लेह-लडाख सोडला तर बाबामुळे सगळा भारत पाहिला आहे."

त्यांना प्रवासाची आणि खाण्याची प्रचंड आवड असल्याचं गार्गी यांनी सांगितलं. ते जेव्हा घरी असतील तेव्हा ते सकाळचा चहा बनवायचे. शिवाय त्याला जमेल त्या गोष्टी त्यांनी मला खाऊ घातलं आहे. आपले वडील उत्तम शेतकरी होते. त्यांनी घराभोवती खूप सुंदर बाग केली होती अशी आठवण सांगताना गार्गी यांनी म्हटलं की, मी पॅशन फ्रूट हे कायम आमच्या घरातल्या बागेतलं खाल्लं होतं. बटर फ्रूट नावाचं एक फळ आमच्या बागेत होतं.

त्यांचा जनसंपर्कही प्रचंड असल्याचं गार्गी यांनी सांगितलं.
नाटकांचे दौरे, सिनेमांचं शुटिंग, सामाजिक कार्य यांमध्ये प्रचंड बिझी असलेले निळू फुले आपल्या कुटुंबात, छंदांमध्ये, शेतीतही तितकाच वेळ काढून रमायचे."त्यावेळी चाहते पत्र लिहायचे. आठवड्याला निळू फुलेंना हजारभर पत्र यायची आणि त्या प्रत्येक पत्राला ते उत्तर द्यायचे. मला शूटिंगच्या निमित्ताने असे लोक भेटतात ते सांगतात की, आमच्याकडे निळू फुलेंचं पत्र आहे."

त्यांचं वाचनही प्रचंड असल्याचं सांगून गार्गी यांनी म्हटलं की, त्यांना फुले-आंबेडकरांच्या लिखाणाचे संदर्भ पानाने माहीत होते. मला त्यांनी मॅक्झिम गॉर्की, डायरी ऑफ अन फ्रँक हे मी बाबामुळेच वाचलं. ते मला वेगवेगळ्या ठिकाणी खायला घेऊन जायचे. आवर्जून काही क्युझिन खायला सांगायचे. आपल्या आई-वडिलांच्या नात्याबद्दलही गार्गी यांनी सांगितलं. निळू फुले यांच्या पत्नी रजनी या उर्दू आणि हिंदीच्या पंडिता. जेव्हा त्यांना मोकळा वेळ असायचा, तेव्हा निळू भाऊ आणि रजनी ताई बेगम अख्तर, गुलाम अली, मेहदी हसन यांच्या रेकॉर्ड्स ऐकायचे. त्यावर बोलायचे.

आपल्या बायकोची आवड जोपासणे आणि त्यात समरसून सहभागी होणं हे खूप विशेष असल्याचं गार्गी नमूद करतात. आपल्या वडिलांमुळे समृद्ध बालपण जगता आलंच, त्याचबरोबर त्यांच्या चळवळीने, विचारांनी एक संवेदनशीलताही मनात रुजवल्याचं गार्गी यांनी म्हटलं. कलाकाराचं पडद्यावरचं आयुष्य आणि प्रत्यक्षातली प्रतिमा यात अनेकदा विरोधाभास असू शकतो. निळू फुलेंच्या बाबतीत तर तो अतिशय ठळक आहे. पडद्यावर वेगवेगळ्या ढंगातला खलनायक रंगवणारा हा माणूस वैयक्तिक आयुष्यात मात्र नायक होता किंबहुना नायकापेक्षाही तो खऱ्या अर्थाने 'मोठा माणूस' होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.