निबंळक : चिखलगोठण (ता. तासगाव) येथे जत्रेच्या दिवशी ताईआईच्यासमोर गाभण मेंढी कापली जाते. तिच्या पोटातील लहान पिलाला तिथेच खड्डा काढून पुरले जाते. मेंढीला कधी एक पिलू असते, कधी दोन असतात. गरोदर मेंढीला कापत असताना पाहणार्यालाही अत्यंत वाईट वाटते. परंतु देवीचा कोप होईल, या अंधश्रद्धेपोटी या प्रथेविरुद्ध कोणी बोलण्याचे धाडस करत नाही. या प्रथेला मूठमाती देण्याचा निर्णय चिखलगोठणच्या ग्रामस्थांनी घेतला.
आषाढ महिन्यात ताईआईची जत्रा असते. या जत्रेसाठी दि. 11 जुलै 2025 रोजी ग्रामस्थांची बैठक झाली. यात्रेत गाभण असणारी मेंढी कापण्याची प्रथा आहे, त्यावर चर्चा झाली. सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, माजी उपसरपंच गुणवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे ताईआईची जत्रा पुरणपोळ्यांचा गोड नैवेद्य दाखवून होणार आहे. उपसरपंच गुणवंत पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत, ताईआईसमोर गाभण मेंढी कापण्याची प्रथा सर्वानुमते बंद करण्यात आली. यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी करीत शनिवार, दि. 12 रोजी पुरणपोळ्यांचा नैवेद्य करण्यात आला. प्रसाद म्हणून पुरणपोळ्यांचा सर्वांनी आस्वाद घेतला. ही प्रथा आता कायमस्वरूपी बंद झाल्याचे सर्वांनी जाहीर केले. ही प्रथा बंद करण्यासाठी सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, माजी उपसरपंच गुणवंत पाटील, जालिंदर पाटील, सुरेश पाटील, दगडू पाटील, आप्पासाहेब पाटील, तंटामुक्त ग्राम समितीचे माजी अध्यक्ष साहेबराव पाटील, श्रीकांत पाटील, अर्जुन पाटील, अधिकराव पाटील आदी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.