Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज आणि उद्धव एकत्र आले तर राज्याचं राजकारण कसं बदलेल?

राज आणि उद्धव एकत्र आले तर राज्याचं राजकारण कसं बदलेल?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा आज वरळी येथील डोम येथे साजरा झाला. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले राज आणि उद्धव राजकारणातही एकत्र दिसणार का?


आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार का? असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल घडू शकतात. राज आणि उद्धव एकत्र आले तर राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील यावर एक नजर टाकूया.

मराठी मते एकवटतील

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जोर देतात. जर हे दोघे एकत्र आले, तर मराठी मतदारांमध्ये विखुरलेली मते एकवटली जाऊ शकतात. यामुळे शिवसेना आणि मनसेची एकत्रित ताकद वाढेल, विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यासारख्या शहरी भागात दोन्ही पक्षांना मोठं यश मिळू शकतं. मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत याचा सर्वात मोठा परिणाम दिसू शकतो. सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची ठाकरे गटाशी स्पर्धा आहे. राज आणि उद्धव एकत्र आल्यास, मराठी मतांचे विभाजन थांबेल आणि त्यांना BMC मध्ये सत्ता मिळवण्याची संधी मिळू शकते.



ठाकरे गटासाठी हे मोठ कमबॅक ठरु शकते. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या विचारसरणीला पुन्हा बळ मिळेल. यामुळे एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखले जाऊ शकते.

महाविकास आघाडीवर परिणाम

राज आणि उद्धव एकत्र आले, तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, युतीच्या नव्या समीकरणांचा विचार करावा लागेल. राज ठाकरे यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा आक्रमकपणा महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना न पटणारा असू शकतो. त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत स्वतंत्र युती केली, तर महाविकास आघाडीची एकजूट कमजोर होऊ शकते. असात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्वतंत्र रणनीती आखावी लागू शकते.


एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर परिणाम

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार पुन्हा ठाकरे बंधूकडे आकर्षित होऊ शकतात. यामुळे शिंदे गटाची ताकद, विशेषतः मुंबई आणि कोकणात, कमी होऊ शकते. तर दुसरीकडे भाजपने मराठी मतांचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटाशी युती केली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास, भाजपला मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागेल. यामुळे भाजपची ताकद देखील कमी होऊ शकते.

राज ठाकरे यांच्या मनसेची घडी सध्या विस्कटलेली आहे. ती सावरण्याची संधी राज ठाकरेंच्या मनसेला मिळू शकते. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यास मनसेला राजकीय वजन वाढण्याची संधी मिळेल. मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्याने त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने विरोधक प्रश्न उपस्थित करतात. तर राज ठाकरे आक्रमक हिंदुत्व आणि मराठी मुद्द्यावर बोलतात. या वैचारिक फरकांचा समन्वय साधणे आव्हानात्मक असेल. मात्र राज आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, यावर दोन्ही पक्षांच्या भविष्यातील वाटचाल अवलंबून आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.