Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- कृष्णाकाठचा कडेगावचा मोहरम म्हणजे गंगा-जमुनी परंपरेचा सांस्कृतिक प्रवाह. गगनचुंबी 'ताबूत' हे खास आकषर्ण!

सांगली :- कृष्णाकाठचा कडेगावचा मोहरम म्हणजे गंगा-जमुनी परंपरेचा सांस्कृतिक प्रवाह. गगनचुंबी 'ताबूत' हे खास आकषर्ण!


'मोहरम' हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते.


त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. महाराष्ट्र्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण साजरा केला जातो.

ताजिये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात मोहरम वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात, मोहरम साजरा करण्याची स्वतःची अशी एक ओळख असते. अनेक ठिकाणी मोहरमच्या सणामध्ये हिंदू- मुस्लिम दोन्ही समाज सहभागी होतात. एकप्रकारे हिंदू - मुस्लिम ऐक्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं उदाहरण आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव एक छोटस शहर. या शहरात अनेक वर्षांपासून मोहरम हा सण गुण्यागोविंदाने साजरा केला जातो. कडेगावातील मोहरमची परंपरा ही सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची कहाणी त्याविषयी ..

कडेगावातील मोहरम सबंध भारतात वेगळा का आहे?


कडेगावातील मोहरम उत्सवाची परंपरा सुमारे 150 वर्षांपूर्वी सुरू झाली. असे मानले जाते की, सुमारे हजारो वर्षांपूर्वी कराड येथे मोहरमच्या गगनचुंबी ताबूतांची यात्रा भरत असे. कडेगावचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे यांनी ती यात्रा पाहिली, परंतु तिथे त्यांचा योग्य सन्मान न झाल्याने त्यांनी कडेगावात ही परंपरा सुरू केली. तेव्हापासून कडेगावात मोहरम सणाला एक विशेष स्थान प्राप्त झाले, ज्यामध्ये स्थानिक हिंदू आणि मुस्लिम समुदाय एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.


भाऊसाहेब देशपांडे एकटयानेच ताबूत करून थांबले नाहीत त्यांनी स्वतः बरोबर इतर हिंदूंनाही ताबूत करण्याचा आग्रह धरला. स्थानिक हिंदू बांधव मोठ्या उत्साहाने ताबूत उभारणीत सहभागी होतात, तर मुस्लिम बांधव दसरा आणि होळीच्या उत्सवात हिंदू परंपरांचा आदर करतात. हा उत्सव सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. शंभर वर्षापूर्वीच्या काळातील हिंदूंनी भाऊसाहेबांचे म्हणणे मानले आणि कडेगावात हिंदूंचे ताबूत सुरू झाले.

भारतात कोठेही न आढळणारे हिंदूंचे ताबूत त्यावेळेपासून आजतागायत कडेगावात दिसतात. एका अर्थाने ही ताबूतांची जत्राच. गगनचुंबी ताबूत हे कडेगावचे वैशिष्टय हे ताबूत उचलण्याचा मान सर्वप्रथम हिंदूंनाच. हेही एक वैशिष्ट्यच. हिंदूंना ताबूत उचलण्याचा पहिला मान असलेले कडेगाव हे भारतातील एकमेव गाव असावे.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोहरम


दोन्ही जमातींनी हा उत्सव साजरा करावा, गावातील दुहीला मूठमाती द्यावी, असा विचार कडेगावचे इनामदार भाऊसाहेब देशपांडे यांनी लोकांच्या गळी उतरवला. हे भाऊसाहेब देशपांडे म्हणजे औंध संस्थानिकांचे जावई. मुळातच इनामदार आणि त्यात संस्थानचे जावई. त्यामुळे भाऊसाहेब देशपांडे म्हणजे स्वाभाविकपणेच एक बडे प्रस्थ. भाऊसाहेबांनी सांगावे आणि लोकांनी ऐकावे असा तो काळ.

पण 'पण राजा बोले दल हाले' अशी केवळ यांत्रिक सवय त्यामागे नव्हती. देशपांडे भाऊसाहेबांविषयी गावकऱ्यांना प्रेमही तितकेच वाटत होते. गावकरी उत्स्फूर्तपणे या कल्पनेच्या मागे उभे राहिले. भाऊसाहेब देशपांडे यांनी नवस केला, तोही पीरालाच. 'मला मुलगा होऊ दे मी ताबूत करीन' तेव्हापासून ते ताबूत करू लागले.

हिंदूंचे 7 अन् मुस्लिमांचे 7 ताबूत…


कऱ्हाडपेक्षा उंच ताबूत कडेगावात उभारले जातात. 110, 115, 120 फुटी उंच ताबूत कडेगावचे भूषण ठरले. मोहरमचे ताबूत बांबूपासून अष्टकोनी आकारात बनवले जातात. पहिल्यांदा कळस आणि नंतर पाया आशा अनोख्या पद्धतीने त्यांची उभारणी केली जाते. बकरी ईद झाल्यानंतर मोहरमच्या 'जत्रे'ची तयारी सुरू होते. प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली की, ताबूतांची बांधणी सुरू होते. तुकाराम महाराजांनी 'आधी कळस मग पाया' म्हटले आहे. ताबूतांची उभारणी म्हणजे तुकारामांच्या या अभंगाचा प्रत्यक्ष प्रत्यय.

प्रथम ताबूतांचा कळस बनविला जातो. त्यानंतर अष्टकोनी आकाराचे बांबू कामांचे मजले (ज्याला इकडे कांडकी म्हणतात) तयार केले जातात. या कांडक्यांना रंगीबेरंगी कागद, हंडया, नारळ, नोटा, कला- बूत, फोटो लावून ते सुशोभित केले जातात. ताबूतांच्या बांधणीसाठी हिंदु-मुस्लीम खांद्याला खांदा लावून काम करीत असतात. सगळे मजले तयार झाले की कळसाच्या खाली एक मजला. त्यानंतर खाली एक मजला, त्याखाली एक असे सर्व मजले रचले जातात!


ताबूतांच्या बांधणीचे वैशिष्टय असे की, याला कुठेही गाठ मारली जात नाही! ताबूत बांधीत असताना चिकणमातीने दोरा आवळला जातो. पण ही बांधणीही एवढी भक्कम असते की, मोठा पाऊस येऊन बांधणी भिजली तरच सुटण्याची शक्यता असते! एकाखाली एक मजला रचून ताबूताची उभारणी पूर्ण झाली की, तो ताबूत एका पलंगडीवर ठेवला जातो. त्या पलंगडीत वाघ, सिंह, हरीग यांच्या प्रतिकृती ठेवल्या जातात. एवढे सारे झाले की, मिरवणुकीसाठी ताबूत सिद्ध होतो.


हे ताबूत हुसैन इब्न अली यांच्या बलिदानाचे प्रतीक मानले जातात, जे शिया मुस्लिमांसाठी मोहरमच्या दहाव्या दिवशी स्मरणात ठेवले जाते. या उत्सवात सवारी, डोला यासारख्या परंपरागत मिरवणूक काढल्या जातात. गावातील बारा बलुतेदारांना सहभागी करून घेण्यात त्यावेळच्या स्थानिक नेतृत्वाने दाखविलेला उदारपणा आजच्या काळाच्या संदर्भात लक्षणीय ठरला आहे.

देशपांडे, सुतार, वाणी हे हिंदूंचे तर पटेल, पिरजादे, कळवा, सातभाई हे मुस्लीमांचे असे तेरा ताबूत कडेगावच्या मोहरममध्ये निघतात. त्यापैकी पाच मोठे व इतर लहान, पाटील, कळ- वात आणि सातभाईंचे ताबूत मानाचे मानले जातात. सातभाईचा ताबूत नवसाला पावतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे.


'दुला दुला' … 'मौला अली झिंदाबाद'


कडेगावात वार पेठ मेल मंडळ, बुधवार पेठ मेल मंडळ अशी मंडळे परंपरेनुसार अस्तित्वात आहेत. या मंडळाचे लोक मशिदीत जाऊन रंगून फकिराची सोंगे घेतात आणि गावातून मिरवणुकीने फिरतात. पहिला दिवस या अशा फकिरांचा असतो, दुसऱ्या दिवशी भाटाचे सोंग असते. शुक्रवार पेठ मेल मंडळाचे लोक उदेपूरच्या राजघराण्याचे भार बनतात, तर बुधवार पेठ मेल मंडळाचे लोक हस्तीनापूरच्या राजघराण्याचे भाट बनतात. हे भाट रानभर गावातून फिरत आपापली गाणी म्हणतात.

रात्री दहानंतर दोन्ही राज- घराण्यातील भाटांचा समोरासमोर सामना होतो. मोहरमनिमित्त येथे एकूण चौदा गगनचुंबी तांबूत उभारले जातात. त्यापैकी सात ताबूत हिंदूंचे असतात तर सात ताबूत मुस्लिम समाजाचे असतात. अलोट उत्साहात ताबूत भेटीवेळी उपस्थित भाविकांनी 'दुला दुला' व 'मौला अली झिंदाबाद' असा जयघोष करतात. कडेगावचा मोहरम हा देशाला ऐक्याचा, शांतीचा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला आहे.


मोहरमच्या सणातील कत्तलची रात! ही एक महत्वाची रात्र. कत्तलच्या रात्री, गोरखचे सोंग आणि ताबुतांची पूर्ण होते.सकाळी सर्व ताबूत भेटीसाठी भैरवनाथ मंदिरासमोर आणले जातात. ताबूतांच्या गळाभेटी हा या जत्रेतील उत्कृष्ट क्षण असतो. चारपाचशे माणसे एकेक ताबूत उचलतात. एवढे त्यांचे वजन असते. मानाच्या ताबूतांसह सर्व ताबूत नाथ मंदिरासमोर आले की, त्यांची गळाभेट होते. लोक आनंद कल्लोळ करतात.

सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, बंगलोर, सोलापूर अशा दूरदूरच्या ठिकाणाहून आठ ते दहा हजार लोक गळाभेटीसाठी आलेले असतात.. या गळाभेटीनंतर कडेगावात मोठी यात्रा भरते. गॅरवीच्या दिवशी (म्हणजे अकराव्या दिवशी) ताबूतांची कांडकी म्हणजे मजले उतरवले जातात. दोन्ही मंडळांना ग्रामस्थांकन मिळालेली बक्षिशी (फकिरी) एकत्र करून प्रीतिभोजनाचा कार्यक्रम होतो आणि या जत्रेची सांगता होते.


कडेगावातील मोहरमची परंपरा ही केवळ एक धार्मिक प्रथा नसून, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक समन्वयाचे जिवंत प्रतीक आहे. गगनचुंबी ताबूत, सवारी-डोला मिरवणुका आणि सर्वधर्मीयांचा सहभाग यामुळे हा उत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक अनन्य स्थान राखतो. ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक समुदाय आणि प्रशासन यांचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे कडेगावचे नाव देशभरात गौरवाने घेतले जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.