राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन घेऊन येता का?; रोहित पवारांविरुद्ध पोलीस बॉईज संघटना आक्रमक
सध्या सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दिसत आहेत. तेथे रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. एक पोलीस अधिकारी हातवारे करत रोहित पवार यांच्याशी बोलत होता. ते पाहून रोहित पवार यांना राग अनावर झाला. त्यांनी मोठ्या आवाजात त्या अधिकाऱ्याला सुनावले. ते पाहून पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे.
गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
आमदार रोहित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर व्यक्त केलेल्या रोषा विरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. रोहित पवार यांच्यावर 353 नुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली.
काय म्हणाले अध्यक्ष?
राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन घेऊन येता का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शरद पवार कधीच कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला वाकड्या शब्दात बोलले नाही. मात्र रोहित पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. याबाबत मुंबईतील आझाद मैदानावर पोलीस बॉईज संघटनेकडून निदर्शने केली जाणार आहेत असे अध्यक्ष राहुल दुबाले म्हणाले.
काय आहे प्रकरण?
रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केली. या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोन्ही आमदार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. एक पोलीस अधिकारी हातवारे करत रोहित पवार यांच्याशी बोलत होता. ते पाहून पवार संतापले. त्यांनी मोठ्या आवाजात त्या अधिकाऱ्याला सुनावले, "हातवारे करू नका… आवाज खाली ठेवा… शहाणपण करू नका… बोलता येत नसेल तर बोलू नका, कळलं का?" या वेळी रोहित पवारांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्यांनी "साहेबांना हात लावायचा नाही," असा इशारा पोलिसांना दिला. या घटनेदरम्यान जितेंद्र आव्हाडही तिथे उपस्थित होते. आव्हाड आणि काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलीस ठाण्यातील तणाव काहीसा निवळला. मात्र, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.