सांगली : वेतनातील त्रुटी दूर करा, सर्व भत्ते लागू करा, यांसह विविधि मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. सकाळी संघटनेच्यावतीने येथील शासकीय रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. सांगली-मिरज शासकीय रुग्णालयातील तीनशे परिचारिका संपावर गेल्याने रुग्ण सेवेवर परिणाम झाला आहे. प्रशासनाने संपाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे 15 व 16 जुलैरोजी धरणे आंदोलन व त्यानंतर 17 जुलैरोजी एक दिवशीय काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची शासनामार्फत दखल न घेतल्यामुळे शुक्रवारपासून (दि. 18) परिचारिका संघटनेच्यावतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनामध्ये सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णातील 150, मिरज शासकीय रुग्णालयातील 70, तर सार्वजनिक आरोग्य विभागातील 40 यासह इतर ठिकाणचे मिळून तीनशे परिचारिका संपावर गेल्या आहेत. यामुळे शासकीय रुग्णालयातील सेवेवर परिणाम झाला आहे. सध्या विद्यार्थी परिचारिका म्हणून काम करणार्या 60 विद्यार्थिंनीकडून काम करून घेण्यात येत आहे.शुक्रवारी सकाळी नर्सेस संघटनेच्यावतीने शासकीय रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्ष दत्ताराम ढमाले, सरिता हाके, स्वप्नजा मांडवकर, संपदा जोशी, अमृता शेडबाळकर, चित्रा बगले, शैला खाडे, धनश्री खोत, गार्गी तोडकर, स्वप्नाली यादव, मानसी पानसरे, हर्षाली सुतार, विजय सदामते, क्रांती आवळे, शलमोन वारे, मोहसिन मुजावर सहभागी झाले होते. शासकीय रुग्णालय, सांगली-मिरजेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव म्हणाले, परिचारिकांच्या दोन संघटना कार्यरत आहेत. एक संघटनेचा संप आहे, दुसरी संघटना कामावर आहे. पारिचारिका विद्यार्थिंनीची मदत घेण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.