लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानाबाहेर असलेल्या क्यूआर कोडवर दुसरे क्यूआर कोड चिटकवून दुकानदारांची फसवणूक करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याने दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरात शेकडो दुकानांच्या बाहेर स्वतःच्या बँक खात्याचे क्यूआर कोड लावले असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
मीरा रोड येथे राहणारे दिनेश गुप्ता (५६) यांचा खार पश्चिम येथील पी. डी. हिंदुजा मार्ग या ठिकाणी विजय पान शॉप नावाचे दुकान आहे. ग्राहकांकडून यूपीआय द्वारे पैसे घेण्यासाठी गुप्ता यांनी दुकानाबाहेर ‘क्यूआर कोड’ ची प्रत चिटकवलेली आहे. गुप्ता यांच्या क्यूआर कोडवर ग्राहकांनी पाठवलेले रक्कम येत नव्हती, पैसे आल्यानंतर गुप्ता यांच्याकडे असलेल्या यूपीआय मशीन मधून आवाज येत नसल्यामुळे त्यांना मशीन नादुरुस्त झाल्याचा संशय आला. बराच वेळ ग्राहकांनी केलेल्या युपीआय पेमेंटचा गुप्ता यांच्या मोबाईलवर मेसेज येत नसल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी त्यांच्या दुकांनाबाहेर लावलेला क्यूआर कोड स्कॅन केला असता त्याच्यावर शिवम दुबे नाव आले. त्यांनी क्यूआर कोड तपासला असता गुप्ताच्या क्यूआर कोडच्या जागी दुसऱ्याने क्यूआर कोड चिटकवलेले आढळून आले. गुप्ता या दुकानदाराने आजूबाजूच्या दुकानदार, फेरीवालांकडे चौकशी केली असता त्यांच्या देखील क्यूआर कोडच्या जागी शिवम दुबे नावाच्या व्यक्तीने क्यूआर कोडचे स्टिकर चिटकवलेले आढळून आले आहे.
खार मध्ये जवळपास डझनभर दुकानदाराचे क्यूआर कोड बदलण्यात आल्यानंतर त्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. खार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. वैभव काटकर, सायबर अधिकारी पोउनि. भीमराव धापटे या पथकाने सीडीआरचा मग काढून आरोपीवर पाळत ठेवून शिव ओम दुबे (२२) याला अटक करण्यात आली. शिव दुबे हा मूळचा यूपीचा असून सध्या तो मुंबईतील कुलाबा मच्छिमार नगर येथे राहण्यास आहे. त्याच्याकडे तीन बँक खाती असून तिन्ही खात्यांचे त्याने यूपीआय उघडले आहे. स्वतःचा यूपीआय क्यूआर कोड त्याने मुंबईतील ज्या दुकानदार, फेरीवाले, पान शॉपच्या बाहेर असणाऱ्या क्यूआर कोडवर स्वतःचा क्यूआर कोड चिटकवून ग्राहकांनी यूपीआय द्वारे केलेले पेमेंट स्वतःच्या ओम शिव स्वतःच्या खात्यावर घेत असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून त्याचे तिन्ही बँक खाते तपासण्यात येत असून त्याने मुंबईत कुठेकुठे हा प्रकार केला आहे याबाबत चौकशी सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.