सांगली :-बेळंकीचा तलाठी, कोतवाल 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
सांगली :- सात-बारा उतार्यावर प्लॉटची नोंद करण्यासाठी अडीच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी बेळंकी (ता. मिरज) येथील तलाठी व कोतवाल या दोघांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली.
तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण (वय 50, रा. रघुकुल अपार्टमेंट, ब्राह्मणपुरी, मिरज) व कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे (53, रा. बौद्ध मंदिराजवळ, बेळंकी) अशी लाचखोरांची नावे आहेत. या दोघांवर मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादीच्या भावाने प्लॉट खरेदी केला होता. या प्लॉटची सात-बारा उतार्यावर नोंद करण्यासाठी कोतवाल वाघमारे याने तलाठी चव्हाण यांना देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेे या तक्रारीची पडताळणी केली. गुरुवारी बेळंकीतील तलाठी कार्यालयाबाहेर पथकाने सापळा लावला. यावेळी अडीच हजार रुपयांची लाच घेताना कोतवाल वाघमारे याला रंगेहाथ पकडण्यात आले. कोतवालाला लाच स्वीकारण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाल्याने तलाठी चव्हाण यालाही पथकाने ताब्यात घेतले. दोघांवर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करणयात आला.
ही कारवाई लाचलुचपतचे उपअधीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, अंमलदार ऋषीकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनजंय खाडे, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, विना जाधव यांच्या पथकाने केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.