विजेमुळे जळालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईचे अधिकार मंडल अधिक्षक अभियंत्यांना द्या : आमदार सुहास बाबर
विटा : विजेच्या ठिणग्यांमुळे पीक जळून झालेल्या नुकसान भरपाईचे अधिकार मंडल कार्यालयातील अधिक्षक अभियंत्यांना द्यावेत, अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी अधिवेशनात केली.
अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आज (दि.3) गुरुवारी आमदार सुहास बाबर यांनी पीक जळून झालेल्या नुकसान भरपाईचे अधिकार मंडल कार्यालयातील अधिक्षक अभियंत्यांना द्यावेत याबद्दल आवाज उठवला. विजेच्या तारांतून ठिणग्या पडून शेती पीक जळीत झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. हा विषय संपूर्ण राज्याचा विषय आहे. गेल्या सात वर्षात एकट्या खानापूर मतदारसंघात ३७८ घटनांचे प्रस्ताव वीज महावितरण कंपनीकडे पाठविण्यात आले होते. मात्र यापैकी फक्त १३ प्रस्तावच मंजूर होऊन संबंधितांना नुकसान भरपाई मिळाली. महावितरणच्या वीज वाहक तारा शेतातून गेलेल्या आहेत. यामध्ये तांत्रिक बिघाड अथवा वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे ठिणग्या पडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
अशावेळी महावितरणला शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करीत असतो. मात्र ही नुकसान भरपाई देण्याचे अधिकार महावितरणचे प्रादेशिक संचालक यांना आहे. क्षेत्रीय कार्यालयातून प्रस्ताव प्रादेशिक संचालक कार्यालयात जाणे आणि तिथून त्रुटी काढून परत माघारी येणे. त्रुटी पुर्तता करून पुन्हा प्रस्ताव सादर करणे, ही प्रक्रिया वेळकाढूपणाची आहे, शिवाय नुकसान भरपाई देण्याचे अधिकार गेल्या ५-६ वर्षांपासून प्रादेशिक संचालकास आहेत. त्रुटी पूर्तता आणि वेळकाढूपणा यांत प्रस्ताव प्रलंबित राहतात. त्यामुळे प्रस्ताव मंजूरीचे अधिकार मंडल कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना द्यावेत आणि खानापूर मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव लवकर मंजूर करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार बाबर यांनी यावेळी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.