काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याबाबत आज मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या. ते भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार असे सांगितले जात होते. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आज त्यांची चर्चा झाली. काही गोष्टींची स्पष्टता झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पाटील यांनी या बैठकीत स्पष्ट केली. त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधत काँग्रेस सोडू नका, असे आवाहन केले. त्यानंतर आमदार विश्वजीत कदम यांच्याशी श्री. पाटील यांची चर्चा झाली. त्यात बरीच खलबते झाली.
मुंबईत आज पृथ्वीराज पाटील यांच्या सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांशी गाठीभेटी झाल्याचे सांगण्यात आले. भाजपतील प्रमुख नेत्यांना ते भेटलेच मात्र विश्वजीत कदम यांच्याशीही त्यांची सविस्तर भेट झाल्याचे समजते. यामुळे, ते काँग्रेस मध्येच राहणार का भाजपची वाट धरणार याबद्दलचा निर्णय अजून गुलदस्त्यातच आहे. पृथ्वीराज पाटील यांना शिंदे यांच्या शिवसेनेसह व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गेले काही महिने स्वकियानी केलेल्या विश्वासघातामुळे अस्वस्थ असलेले पृथ्वीराज पाटील पक्ष सोडतात का काँग्रेसश्रेष्ठी त्यांना थांबवण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे कुतहुलाचे आहे. पृथ्वीराज पाटलांनी मात्र कार्यकर्त्यांशी बोलून आठ दिवसात निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.