Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?

"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
 

नवी दिल्ली:  लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच जम्मू काश्मीरच्या बारामुला मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार इंजिनिअर राशीद यांनी या चर्चेत सहभाग घेतला. आता यापुढे मी इथं येऊ शकत नाही. हे माझं अखेरचं बोलणे आहे. कारण माझ्याकडे इतका पैसा नाही ज्यामुळे मी संसदेत येऊ शकेन असं चर्चेवेळी राशीद यांनी म्हटलं.

खासदार राशीद तिहार जेलमध्ये बंद आहेत. त्यांना संसदेत आणण्यासाठी आणि परत घेऊन जाण्यासाठी खूप संरक्षण द्यावे लागते. मागील दिवसांत त्यांच्यावर १७ लाखांचा दंड आकारला गेला आहे. हा दंड त्यांच्यावर केवळ संसदेत ने-आण करण्यासाठी लावण्यात आला आहे. संसदेत खासदार राशीद यांना आणण्यासाठी दीड लाखाहून अधिक खर्च होतो. कोर्टाच्या सुनावणीत हा खर्च खासदारांना उचलावा लागेल असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे संसदेत भाषण करताना राशीद यांनी माझ्याकडे इतका पैसा नाही, की मी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी इतकी मोठी रक्कम भरू शकेन. आता मी संसदेत येऊ शकत नाही. आज दीड लाख खर्च करून इथं आलोय, त्यामुळे मला बोलू द्या असं खासदार राशीद यांनी लोकसभेत सांगितले.

संसदेत काय बोलले खासदार राशीद?

लोकसभा सभागृहात ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा सुरू होती. त्यात खासदार राशीद यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर माझ्या मतदारसंघातच झाले. आज तिथे लोक त्रस्त आहेत, मला बोलू द्यावे. पुन्हा मी संसदेत येऊ शकत नाही कारण माझ्याकडे दीड लाख रूपये नाहीत. कुठून आणू इतका पैसा, त्यामुळे मला बोलू द्यायला हवे. आम्ही काश्मिरींपेक्षा जास्त पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबाचं दु:ख जाणतो कारण आम्ही १९८९ पासून हजारो लोक गमावले आहेत. काश्मीरात जितकं नुकसान झालं ते आमच्यापेक्षा जास्त कुणाला समजणार नाही. आम्ही मृतदेह उचलताना पाहिलेत. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला माणुसकीचा खून आहे असं त्यांनी म्हटलं.

कोर्टाच्या सुनावणीत ठेवल्या होत्या अटी
बारामुला मतदारसंघाचे खासदार इंजिनिअर राशीद अनेक वर्षापासून जेलमध्ये आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूकही जेलमधून लढवली होती. टेरर फंडिंगच्या आरोपाखाली NIA ने त्यांना अटक केली होती. संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी राशीद यांनी जामीन मागितला होता. पॅरोल कस्टडी अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत त्यांना सोडले जाते. यावेळी त्यांच्यासोबत अनेक पोलीस हजर असतात. इंजिनिअर राशीद यांना कोर्टाकडून २४ जुलै ४ ऑगस्टपर्यंत पॅरोल मिळाला आहे मात्र कोर्टाने त्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. राशीद यांना त्यांच्या प्रवासासाठी आणि सुरक्षेसाठी होणारा खर्च स्वत: भागवावा लागेल. म्हणजेच राशीद जर एक दिवसासाठी संसदेत गेले तर त्यासाठी दीड लाखाच्या आसपास त्यांना खर्च द्यावा लागेल. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरवर चर्चेवेळी त्यांनी हे विधान केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.