धक्कादायक! माजी आमदाराच्या घरात 24 वर्षाच्या तरुणीनं स्वतःवर झाडून घेतल्या गोळ्या; पुढच्या महिन्यात होता विवाह, बेडरूम सील
सतना जिल्ह्यातील चित्रकूटचे माजी काँग्रेस आमदार निलांशू चतुर्वेदी यांच्या घरात गोळी लागून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणीचे नाव सुमन निषाद (वय २४) असून ती माजी आमदारांच्या घरात काम करत होती.
स्वतःवर झाडून घेतली गोळी
मिळालेल्या माहितीनुसार, सुमनने निलांशू चतुर्वेदी यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये माजी आमदारांच्या परवानाधारक पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सुमनला रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
माजी आमदारांचे बेडरूम सील
घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी माजी आमदारांचे बेडरूम सील केले आहे. तरुणीने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
'सुमनला स्वतःच्या मुलीसारखे मानायचे'
सुमनच्या आईनं सांगितलं की, 'ही घटना दुपारी ४ वाजता घडली. आम्ही जेवण करून बसलो होतो. अचानक सुमन बाथरूममध्ये गेली आणि तिने पिस्तुलाने गोळी झाडली.' आईनं पुढं सांगितलं, 'निलांशूजींना मुलगी नाही म्हणून ते सुमनला स्वतःच्या मुलीसारखे मानायचे. तिच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. पुढच्या महिन्यात तिचा विवाह होणार होता आणि या समारंभाचा खर्चही त्यांनी उचलला होता.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.