Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकांआधी उडणार जि.प. निवडणुकांचा बार!

महापालिकांआधी उडणार जि.प. निवडणुकांचा बार!
 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सुमारे 630 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका प्रलंबित आहेत. साधनांच्या कमतरेमुळे आयोगाला एकाचवेळी सर्वांच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे संकेत राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मंगळवारी (दि. 29) छत्रपती संभाजीनगरात पार पडलेल्या आढावा बैठकीत देण्यात आले. 
 
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगर परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यात मागील पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आधी कोरोना महामारी आणि नंतर प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण आदी मुद्द्यांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याबाबत आयुक्तांनी विभागातील परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आधी घेतल्या जातील. त्यानंतर महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी या बैठकीत नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुदतवाढीसाठी करणार अंतरिम अर्ज ः आयुक्त

सर्वोच्च न्यायालयाने मे 2025 मध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याबाबत निकाल दिला; मात्र साधनांच्या कमतरतेमुळे राज्य निवडणूक आयोगाला तयारी करण्यासाठी जास्तीचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आयोगाकडून मुदतवाढ मागण्यासाठी अंतरिम अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचेही निवडणूक आयुक्तांनी बैठकीत सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.