मुंबई : एका १४ वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या चार जणांनी बलात्कार केला. त्या धक्क्यातून ती सावरलेली नसताना तिच्यावर वडील आणि दोन भावांनीही बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी पीडित मुलीचे वडील आणि एका भावाला अटक केली आहे. तिचा दुसरा भाऊ आणि अन्य एक इसम फरार आहे. पीडित मुलगी बाल कल्याण समितीच्या ताब्यात असताना तिने ही माहिती दिली.
पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. तिच्यावर २०२४ मध्ये बलात्कार झाला होता. तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन परिसरातील चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. यामुळे मुलगी पूर्णपणे खचली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला बाल कल्याण समितीकडे (सीडब्ल्यूसी) पाठविण्यात आले होते. या काळात मुलीचे समुपदेशन करण्यात आले. संवाद साधल्यानंतर तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
वडील आणि भावाने केला बलात्कार
पीडित मुलीवर २०२४ मध्ये झालेल्या बलात्कारची माहिती तिच्या कुटुंबाला होती. मात्र त्यांनी तिला धीर देण्याऐवजी तिचाच गैरफायदा घेतला. तिचे ४२ वर्षांचे वडील, तसेच १७ आणि १६ वर्षांच्या भावांनीही तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. याच परिसरातील आणखी एका ५० वर्षीय व्यक्तीनेही तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी फिर्याद दाखल केली. जानेवारी ते नोव्हेबर २०२४ या कालावधीत तिच्यावर वडील आणि भावांनी बलात्कार केला होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या विरोधात या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६३ आणि ६४ (बलात्कार), तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यातील (पोक्सो) कलम ४, कलम ८ (लैंगिक अत्याचार) आणि कलम १२ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन जण फरार
पीडित
मुलीवर पूर्वीच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले
आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच गुन्ह्यात वडील आणि भावाला आरोपी करण्याबाबत
न्यायालयाला सांगितले होते. मात्र न्यायालयाने नवीन गुन्हा दाखल करण्याचे
निर्देश दिले होते. आम्ही मुलीचे वडील आणि एका भावाला अटक केली आहे. तिचा
दुसरा भाऊ आणि ५० वर्षांचा इसम फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे, असे
पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.