सांगली : कसबे डिग्रज, बुधगाव, तुंग आणि कळंबी येथे चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले. याप्रकरणी संशयित दीपक राजाराम माने (वय 19, रा. सांगलीवाडी) व गौतम राजू काळे (वय 20, रा.शामरावनगर, सांगली) या दोघांसह एका अल्पवयीन गुन्हेगारास अटक केली. टोळीकडून चार गुन्हे उघडकीस आणून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत माहिती अशी, कसबे डिग्रज येथील कमानीजवळ प्रीतम प्रभाकर हंकारे यांचे वर्षा हॉटेल आहे. चोरट्यांच्या टोळीने दि. 22 रोजी रात्री अकरा वाजता हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर हॉटेलचा पत्रा उचकटून आतील मिक्सर, गॅस सिलिंडर, ताटे, वाट्या असे सुमारे 35 हजाराचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस तपास करीत असताना संशयित गौतम काळे हा इनाम धामणी येथे चोरीच्या साहित्यामधील गॅस सिलिंडर विक्रीसाठी थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन गौतमला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने साथीदार दीपक माने व अल्पवयीन तरुणाच्या मदतीने बुधगाव, तुंग, कळंबी याठिकाणी हॉटेल, घरफोडी करून भांडीचोरी, दारूचे बॉक्स, तांब्याचा बंब यांची चोरी केल्याची कबुली दिली. दीपक व गौतमला अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.