मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांची एकजूट, मीरा भाईंदरमध्ये बंद, मारहाणीवरुन आक्रमक
मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत जे घडले, ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू शकते, अशा चिंतेतून व्यापाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर एकजूट दाखवत हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
या पार्श्वभूमीवर सेवेन स्कूल, मिरा रोड (पूर्व) येथून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत एक भव्य निषेध रॅली काढण्यात येणार आहे. या घटनेच्या अनुषंगाने व्यवसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण असले तरी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते अविनाश जाधव हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत अविनाश जाधव काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. मनसेने याप्रकरणात आणखी आक्रमक भूमिका घेतल्यास मीरा-भाईंदरमध्ये मनसे विरुद्ध व्यापारी हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय केलं?
जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन मनसेचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेले होते. तेव्हादेखील या दुकान मालकाचा मराठी न बोलण्याचा हेका कायम होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी या दुकान मालकाच्या कानाखाली जाळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
जयंत पाटील:- मनसेच्या वैचारिक भूमिकेला जयंत पाटील यांचा पाठिंबा
मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढल्याने या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापायला सुरुवात आहे. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विचारले असता त्यांनी म्हटले की, मराठीचा आग्रह महाराष्ट्रात नाही करायचा तर कुठे करायचा? मारहाणीचं समर्थन नाहीच. मात्र लोकांनी भावना समजून घ्याव्यात, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.