बुलडाणा : अचूक उत्तर देता आले नाही म्हणून वर्गशिक्षकाने उठाबश्या काढायला सांगितल्या. त्यानुसार उठाबश्या काढून विद्यार्थ्याचे पाय दुखले. त्यामुळे आणखी उठाबश्या मारण्यास विद्यार्थ्याने नकार दिला. तेव्हा मास्तराने वर्गातच तुझी चड्डी काढू का, असे म्हणत आई-वडिलांबाबत अपशब्द उच्चारून अपमानित केले. भरवर्गात झालेला अपमान जिव्हारी लागल्याने दहावीच्या 15 वर्षीय विद्यार्थ्याने मधल्या सुट्टीत जवळच असलेल्या शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी (दि. 1) नांंदुरा तालुक्यातील वसाडी बुद्रुक गावात घडली.
विवेक महादेव राऊत (वय 15, रा. वसाडी बुद्रुक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जय बजरंग विद्यालय, वसाडी बुद्रुक येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटवरून हा प्रकार समोर आला. त्याच्या आत्महत्येला जबाबदार असलेला वर्गशिक्षक गोपाल मारोती सूर्यवंशी (रा. खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी शाळेत गेलेला होता. आरोपी शिक्षक गोपाल सूर्यवंशीचा क्लास सुरू असताना सूर्यवंशीने विवेकला एका प्रश्नाचे उत्तर विचारले. त्याला शिक्षकाला अपेक्षित असलेले अचूक उत्तर देता आले नाही. त्यामुळे शिक्षक सूर्यवंशी संतापला. 'चल उठाबश्या काढ,' असे शिक्षकाने बजावले. त्यावर विवेकने जवळपास शंभर उठाबश्या मारल्या; मग पाय दुखू लागल्याने उठाबश्या काढण्यास विवेकने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सूर्यवंशीने त्याला चांगलेच सुनावले. त्याच्या पालकांबाबत अपशब्द वापरले. शिक्षक तेथेच थांबला नाही, तर त्याने विवेकला भरवर्गात तुझी चड्डी काढू का? असे म्हटले.
शाळेजवळ शेतात घेतला गळफास
भरवर्गात शिक्षकाने वर्गमित्रांसमोर आपल्या आई-वडिलांबाबत वापरलेले अपशब्द, केलेला अपमान या प्रकारामुळे विवेकला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. तो अपमान त्याच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्याने शाळेच्या मधल्या सुट्टीपर्यंत कसाबसा अपमान पचविला; परंतु सुट्टी होताच सरळ जवळच असलेले शेत गाठले आणि तेथे दोरी बांधून गळफास घेतला. काही वेळानंतर त्याने गळफास घेतल्याचे घरच्यांच्या नजरेस पडले. त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले; तोपर्यंत वेळ झाला होता. विवेकला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सुसाईड नोटवरून समोर आला प्रकारे
घटनेनंतर विवेकने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट घरच्यांच्या हाती लागली. तेव्हा त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले. आज वर्गात सूर्यवंशी सरांनी मला अपमानित केले. आई-बाबांंबाबत अपशब्द वापरले. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याने त्याने लिहिलेले होते. त्या चिठ्ठीवरून शिक्षक गोपाल सूर्यवंशी याच्याविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सूर्यवंशीला ताब्यात घेतले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.