इस्लामपूर : वाघवाडीनजिक (ता. वाळवा) येथे महामार्गावर किरकोळ कौटुंबिक वादातून मुंबई येथील डॉक्टर महिलेने हातावर, गळ्यावर ब्लेडने वार करून घेत जीवन संपविल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. डॉ. शुभांगी समीर वानखेडे (वय 44, रा. मुलूंड पश्चिम, ग्रेटर मुंबई) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री 9.30च्या सुमारास महामार्गावर डॉ. शुभांगी जखमी अवस्थेत आढळल्या होत्या.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुभांगी या मुंबई येथील खासगी दवाखान्यात नोकरीला होत्या. त्या स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. त्यांचे पती समीर हेही डॉक्टर आहेत. काही दिवसांपासून शुभांगी यांचा त्यांच्या घरातील लोकांशी किरकोळ कारणावरून वाद होत होता. दोन दिवसांपूर्वीही घरात वाद झाला. मंगळवारी सकाळी शुभांगी या घरी दवाखान्यात जात असल्याचे सांगून मोटार (एमएच 03 एआर1896) घेऊन बाहेर पडल्या होत्या. त्यांचा मोबाईलही बंद होता.
मोटारीच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या...
मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वाघवाडीनजिक महामार्गावर मोटारीच्या पाठीमागे एक महिला जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, उपनिरीक्षक विकास जाधव, पोलिस संदेश यादव, बळीराम घुले, अमोल सावंत, शशिकांत शिंदे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोटार पुण्याच्या दिशेने तोंड करून उभी होती. तेथे मिळालेल्या ओळखपत्रावरून जखमी महिला डॉ. शुभांगी वानखेडे असल्याचे समोर आले. शुभांगी या मोटारीच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या गळ्यावर, हातावर ब्लेडचे खोलवर वार होते. हातातून, गळ्यातून मोठा रक्तस्राव झाला होता. पोलिसांनी शुभांगी यांच्या मोटारीची तपासणी केली असता मोटारीतही रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी शुभांगी यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉ. शुभांगी यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.