प्राचार्यांच्या निवृत्ती वयात वाढ; मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा
अमरावती : अमरावती शहरात आज (दि. २५) अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे ४० वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले केले आहे. राज्यभरातील शेकडो प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ आणि संघटनांचे पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
प्राचार्यांच्या निवृत्ती वयात वाढ
अधिवेशनातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे प्राचार्यांच्या निवृत्ती वयात वाढ. आता प्राचार्यांना ६२ ऐवजी ६५ वर्षांपर्यंत सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील अनुभवसंपन्न लोक अधिक काळ कार्यरत राहणार आहेत.
प्राचार्यांच्या मागण्यांवर मंत्री पाटील यांची स्पष्टोक्ती
अधिवेशनात प्राचार्यांनी शैक्षणिक धोरण, शासकीय निर्णय आणि विविध मागण्यांवर आपली मते मांडली. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "वीस वर्षे प्राध्यापकांची भरती झाली नव्हती, ती आमच्या सरकारने केली आहे. शैक्षणिक धोरणावर चर्चा करणे आवश्यक असले तरी, केवळ मागण्या मांडून चालणार नाही, बदलासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे."
प्राचार्य नंदकुमार निकम यांची सरकारच्या उणीवावर बोट
प्रिन्सिपल असोसिएशनचे उपाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शासकीय निर्णयांवर सरकारच्या उणिवा अधोरेखित केल्या. ते म्हणाले की, "आम्ही अनेक वेळा सरकारकडे मागण्या मांडतो, मात्र त्या पूर्ण होत नाहीत. शिक्षक भरती, शैक्षणिक सुविधा, आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये अजूनही अनेक अडचणी आहेत.
अधिवेशनातील चर्चा आणि पुढील दिशा
या अधिवेशनात प्राचार्यांच्या नेतृत्वातील शैक्षणिक सुधारणा, नव्या धोरणांची अंमलबजावणी, आणि शिक्षकांच्या हिताच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या भविष्याचा आराखडा ठरवण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या राज्यस्तरीय अधिवेशनात प्राचार्यांच्या निवृत्ती वयात वाढ, शिक्षक भरती, आणि शैक्षणिक धोरणातील सुधारणा या मुद्द्यांवर ठोस चर्चा झाली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेमुळे प्राचार्यांना दिलासा मिळाला असला, तरीही प्राचार्य नंदकुमार निकम यांनी सरकारकडून अजूनही अपेक्षित असलेल्या सुधारणा आणि मागण्यांची आठवण करून दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.