Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मद्यच्या वाढीव दरामुळे मद्य शौकिनांची होतेय परवड! देशी-विदेशी मद्य विक्रीत ३० टक्क्यांनी घसरण; 'गावठी' कडे वाढतोय कल

मद्यच्या वाढीव दरामुळे मद्य शौकिनांची होतेय परवड! देशी-विदेशी मद्य विक्रीत ३० टक्क्यांनी घसरण; 'गावठी' कडे वाढतोय कल
 

उमरगा, (जि धाराशिव) :  राज्य सरकारने महसुल वाढवण्यासाठी मद्य विक्रीवर लावलेला भरमसाठ विक्री कर, परवाना नुतनीकरण अन् सेवा करामुळे मद्य विक्रीचे दर वाढल्याने मद्य शौकिनांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. तर बार चालकाकडून कडून यापुढे जाऊन अव्वाच्या सव्वा भावाने दारू विक्री केली जात असल्याने, ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागत असल्याने झिंगाट झालेल्या ग्राहकांच्या तक्रारीला विक्रेत्यांना तोंड द्यावे लागत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाल्याचे प्रकार घडताहेत. मात्र देशी, विदेशी मद्य विक्रीतुन मिळणारा महसुल राज्याच्या तिजोरीला हातभार लावणारा असतो, त्यामुळे शासन मद्य विक्रीचे परवाने अगदी ग्रामीण भागापासुन ते शहरी भागात वाढवले आहेत. लाडकी बहिण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार वाढल्याने सरकारने मद्य विक्रीवर कर वाढवून महसुल जमा करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय.

दरवाढीमुळे ग्राहकांच्या वाढल्या तक्रारी
उमरगा तालुक्यात अधिकृत मद्य विक्रीचे जवळपास ११० दुकाने आहेत, बिअर शॉपीचेही परवाने देण्यात आले आहेत. मद्य दरवाढीचा व जादा दराने दारू विक्री चा आर्थिक फटका दैनंदिन ग्राहकांना बसतोय. एका कंपनीच्या १८० मि.लि. क्षमतेच्या बॉटलचा एमआरपी दर १६० रुपये होता, तो दरवाढीमुळे चक्क २२० रुपये झाला.
 
विक्री कर, सेवा कर लावून विक्रेते ती बॉटल २८० ते तीनशे रुपयाला विक्री केली जात. येथील विक्रेत्यांनी नवीन मद्य येण्यापूर्वी जुना शिल्लक मद्य विक्री वाढीव दराने केली जात असल्याने ग्राहक व विक्रेत्यात तक्रारी वाढल्या आहेत. ग्राहकांच्या दारूची गरज लक्षात घेऊन चढ्या भावाने दारू विक्री केली जात असून, याला स्थानिक युनियन ची साथ आहे.

कमी मात्रा असलेल्या बॉटल निर्मितीचा प्रस्ताव!

ग्राहकांना सवयी प्रमाणे लागणाऱ्या दारू साठी आगाऊ रक्कम द्यावी लागत असल्याने विक्रीत घसरण होत आहे. मद्यनिर्मितीच्या कंपनीने १८० मिली क्षमते ऐवजी १५० मिली क्षमतेच्या बॉटलची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिल्याची माहिती सांगण्यात येत आहे. कमी मात्रा असली तरी दर पूर्वीसारखा होईल, असा समज यातुन असावा. मात्र ज्या त्या ग्राहकांच्या मद्य सेवन क्षमते प्रमाणे दराचा फटका बसणारच आहे.

...तर 'गावठी' कडे वाढेल कल !
दरवाढीमुळे विदेशी दारुसाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने आर्थिक क्षमता नसणाऱ्या ग्राहकांचा कल कालांतराने देशी दारुकडे जाऊ शकतो. देशी दारू सेवन करणारे ग्राहक गावठी हातभट्टी, शिंदी कडे जातील. परिणामी येणाऱ्या काळात शासनाच्या महसुलात घसरणही होईल, शिवाय ग्राहकांचे आयुष्यमानही औटघटकेचे ठरु शकते.
'वाईन शॉप' बंदमुळे फटका !

शहरात एकमेव असलेले वाईन शॉप गेल्या अडीच - तीन महिन्यापासून बंद असल्याने मद्यपींना बार मधून चढ्या भावाने दारू विकत घ्यावी लागत आहे. दररोज दारू लागणाऱ्या मद्यपीची लूट यामुळे होत असून, संबधित दारूबंदी खाते याबाबत काहीच कारवाई करित नाही. यामुळे ग्राहकांना चढ्या भावाने दारू खरेदी शिवाय पर्याय राहिला नाही. दारूबंदी खात्याने ही लूट थांबवावी अशी मागणी होत आहे.

श्रावण महिन्यातील व्रज्य ठरेल महत्वाचे
दारूचे व्यवनामुळे शारीरिक हानी तर होतेच, शिवाय मानसिक स्थैर्यही नसते. कांही शौकिन श्रावण महिन्यात मांसाहार, दारू व्रज्य करण्याचा निर्धार करतात. आज गुरुवारी (ता. २४) अमावस्या संपल्याने शुक्रवार पासून (ता. २५) श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. महागड्या दारूमुळे बसणारा आर्थिक फटका कायमचा दूर करण्याची श्रावणासारख्या पवित्र महिन्यात संधी आली आहे, त्याचे पालन कितीजण करतात हे पहावे लागेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.