इचलकरंजी :-'खेळाडू'च्या छायेत माव्याचे साम्राज्य; तुरुंगातून बाहेर पडला अन् तब्बल ३५ पान शॉप्स उभारल्या
इचलकरंजी : शहरात पसरलेल्या अवैध मावा विक्रीच्या 'खेळाडू' पान शॉपच्या साम्राज्यामागे अंधारलेली, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एका खुनाच्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या एका म्होरक्याने तुरुंगातून बाहेर पडताच माव्याच्या व्यवसायात उडी घेतली आणि अगदी काही वर्षांत तब्बल ३५ पान शॉप्स उभारून स्वतःचे काळे 'खेळाचे मैदान' तयार केले आहे.
मावा विक्रीवर बंदी आणि सध्या पोलिस कारवाई टाईट असताना सुद्धा हा 'खेळाडू' खुलेआम अड्डा चालवत आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर 'खेळाडू'ने जुन्या भागीदाराशी असलेली भागीदारी तोडली आणि नव्या सहकाऱ्यांसोबत पहिली पानपट्टी शॉपिंग सेंटर परिसरात सुरू केली. सुरुवातीला छोट्या गादीवर सुरू झालेला मावा व्यवसाय हळूहळू शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. हातकणंगले, शिरोळ तालुक्यात त्याने मुक्तपणे अनेक पानपट्ट्या उभारल्या.
दररोज काळ्या काचेच्या आलिशान गाडीतून तो स्वतः सर्व पान शॉपवर नजर ठेवत एका टेम्पोमधून मालपुरवठा केला जातो. सर्व व्यवहाराचे सूत्र त्याच्याच हातात असूनही त्याने कुठेही नाव कागदोपत्री नोंदवलेले नाही. या पानपट्ट्यांत ना साधे पान मिळते, ना मसाले. फक्त मावा, सुगंधी तंबाखू आणि त्याच्याशी संबंधित घातक पदार्थच विकले जातात. इतकेच नव्हे तर या पान शॉपमध्ये माव्यासाठी गांजाचे पाणी वापरले जाते, अशीही चर्चा शहरात आहे. खेळाडूच्या शाखांत दररोज हजारो पुड्यांची मावा विक्री होते. एवढी मागणी असतानाही याप्रकरणी कोणतीही कायदेशीर नोंद नाही. या पानपट्टी साम्राज्याला मिळालेला राजकीय पाठिंबा हे अधिक चिंतेचे कारण आहे.प्रभावशाली राजकीय नेत्याशी त्याचा संबंध तसेच स्वतःच्या वडिलांचे लोकप्रतिनिधी म्हणून वावरणे यामुळे 'खेळाडू'ला कोणताही धाक नाही. त्यामुळे त्याचा मोकळा वावर, पोलिसांची अनास्था आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे त्याचा दिवसेंदिवस बिनधास्त धंदा फोफावत आहे. शहरातील हजारो युवकांना नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या या काळ्या माव्याच्या साम्राज्यावर त्वरित, कठोर आणि कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा हा 'खेळाडू' फक्त व्यवसायात नव्हे समाजाला अंधारात लोटण्याच्या खेळातही विजेता ठरेल.
खेळाडूसाठी दोन लाखांची फ्रेंचायझी
खेळाडू हे नाव वापरण्यासाठी या म्होरक्यांकडून दोन लाख रुपये घेतले जातात. किरकोळ फर्निचर, बोर्ड देऊन बाकी सर्व साहित्य त्यांच्याकडूनच खरेदी करण्याचा अटीतटीचा दबाव असतो. एका दुकानासाठी तीस हजारांचा खर्च असताना नावासाठी दोन लाखांची लूटच केली जाते. आणि तुझ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा शब्द दिला जातो.
पानपट्टी उद्घाटनाला 'फ्री' मावा
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवून युवकांना आकर्षित करण्यासाठी काही मावा पानपट्टीचालकांनी खेळाडूच्या नावाचा व फोटोचा टॅटू हातावरून काढला आहे. रीलच्या जोरावरच त्याने मोठ्या प्रमाणात फ्रेंचायझी दिल्या. याचा पसारा इचलकरंजी, शिरोळ, कागल, हातकणंगले तालुक्यासह कर्नाटक सीमाभागात आहे. प्रत्येक शॉपच्या उद्घाटनाच्या वेळी परिसरातील युवकांना फ्री मावा देऊन माव्याची चटक लावली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.