Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्तीवेतनाचा आधार

बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्तीवेतनाचा आधार
 

कुडाळ : आयुष्यभर ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता काबाडकष्ट करणार्‍या राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या कामगारांना आता भरीव निवृत्तीवेतन (पेन्शन) मिळणार आहे.

या योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीला शासनाने मंजुरी दिली असून, 19 जून 2025 रोजी तसा शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 58 लाख, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कामगारांना त्यांच्या म्हातारपणी मोठा आर्थिक आधार मिळणार असल्याची माहिती श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली.

 
श्रमिक कामगार संघटनेने या मागणीसाठी अनेक वर्षे शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तत्कालीन कामगार मंत्री सुरेश खाडे आणि विद्यमान कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे बैठका घेऊन या योजनेचे महत्त्व पटवून दिले होते. अखेर या लढ्याला यश आले असून, कामगारांच्या हिताचा हा कल्याणकारी निर्णय घेतल्याबद्दल प्राजक्त चव्हाण यांनी शासनाचे आभार मानले आहे

सरळ आणि सोपी प्रक्रिया
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून, लाभ थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने पारदर्शकता राहील. मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतनाचा आकडा ठरणार आहे.कर्मचारी राज्य विमा किंवा भविष्य निर्वाह निधी कायद्यांतर्गत लाभ घेणारे कामगार या योजनेसाठी पात्र नसतील.पती-पत्नी दोघेही नोंदीत बांधकाम कामगार असल्यास, ते स्वतंत्रपणे या योजनेसाठी पात्र असतील.अर्ज कसा करावा? पात्र कामगारांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य डाऊनलोड करता येईल.
 
पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड) आपल्या आधार कार्ड नोंदणीच्या जिल्ह्यातील कामगार सुविधा केंद्रात जमा करायचे आहेत. त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा निवृत्तीवेतन जमा केले जाईल, असे प्राजक्त चव्हाण यांनी सांगितले. एकंदरीत, शासनाच्या या निर्णयामुळे आयुष्यभर घरांची उभारणी करणार्‍या कामगारांच्या आयुष्याचा पाया वृद्धापकाळात भक्कम होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

काय आहे शासनाचा निर्णय?

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अवर सचिव सगुणा काळे-ठेंगील यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 मधील तरतुदीनुसार ही निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची कार्यपद्धती निश्चित झाल्याने आता पात्र कामगारांना थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

योजनेचे प्रमुख फायदे
आर्थिक सुरक्षा: वयाच्या साठीनंतर काम करण्याची क्षमता कमी झाल्यावर कामगारांना सन्मानाने जगण्यासाठी निश्चित उत्पन्न मिळेल. नोंदणीनुसार वाढीव लाभ: जेवढी जास्त वर्षे मंडळाकडे नोंदणी, तेवढा जास्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे.कुटुंबाला आधार: पती-पत्नी दोघेही कामगार असल्यास दोघांनाही स्वतंत्रपणे लाभ घेता येईल. तसेच, एकाच्या मृत्यूनंतर दुसर्‍याला पेन्शन सुरू राहील.

पहिली पायरी : 10 वर्षे नोंदणी = 6,000

दुसरी पायरी : 15 वर्षे नोंदणी = 9,000

तिसरी पायरी : 20 वर्षे नोंदणी = 12,000

निवृत्तीवेतनाचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष

कामगाराने वयाची 60 वर्षे पूर्ण केलेली असावीत

मंडळाकडे किमान 10 वर्षे सलग नोंदणी असणे अनिवार्य

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.