एकच छंद 'गोपीचंद'... कसे झाले फडणवीसांचे आवडते, राजकारणातील अभि'नेता' विधिमंडळातील हाणामारीमुळे चर्चेत!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोपीचंद पडळकर हे नाव चर्चेचा विषय ठरलं आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळातील हाणामारी प्रकरणाने त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं. जितेंद्र आव्हाड यांनी वापरलेल्या "मंगळसूत्र चोर" या शब्दामुळे पडळकरांचे कार्यकर्ते आणि आव्हाडांचे कार्यकर्ते यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.
या घटनेनंतर पडळकरांनी माफी मागितली, पण प्रश्न उपस्थित झाला आहे की, विधानभवन हे जनतेच्या प्रश्नांसाठी आहे की राड्यासाठी? पडळकरांचा आक्रमक स्वभाव आणि शरद पवार यांच्यावरील सातत्याने होणारी टीका यामुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहतात. पण कोण आहेत हे गोपीचंद पडळकर? आणि ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवडते नेते कसे झाले?
अभिनेत्यापासून राजकारण्यापर्यंतचा प्रवास
गोपीचंद कुंडलिक पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. सध्या ते जत मतदारसंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार आहेत. यापूर्वी, 14 मे 2020 रोजी ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय समाज पक्षातून केली. 2014 मध्ये ते पहिल्यांदा भाजपकडून आटपाडी-खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढले, पण त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीत सामील होऊन त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला, पण त्यांनी तीन लाखांहून अधिक मते मिळवत चांगली लढत दिली. ऑक्टोबर 2019 मध्ये ते पुन्हा भाजपमध्ये परतले आणि बारामतीतून अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवली, पण याही वेळी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. 2020 मध्ये भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली, आणि 2024 मध्ये जत मतदारसंघातून त्यांनी यश मिळवलं. पडळकर हे केवळ राजकारणीच नाहीत, तर चित्रपट निर्माते आणि अभिनेतेही आहेत. 2019 मध्ये त्यांनी 'धुमस' या चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात त्यांनी स्वतः अभिनयही केला.
पडळकरांचं शिक्षण मात्र बारावीपर्यंतच
गोपीचंद पडळकर यांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी आहे. हा दुष्काळी भाग असला, तरी या गावाची ओळख 'डॉक्टरांची वाडी' अशी आहे. 100 कुटुंबांपैकी 40 कुटुंबांमध्ये डॉक्टर आहेत. पण स्वतः पडळकरांचं शिक्षण मात्र बारावीपर्यंतच झालं आहे. त्यांच्या गावाची ही अनोखी ओळख त्यांच्या राजकीय प्रवासाला वेगळी पार्श्वभूमी देते.
वादग्रस्त वक्तव्यांचा बादशहा
पडळकर आणि वाद यांचं नातं काही नवीन नाही. विशेषतः शरद पवार यांच्यावरील त्यांची टीका नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत," असं वक्तव्य त्यांनी केलं होतं, ज्यामुळे मोठा गदारोळ झाला. तसेच, अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरूनही त्यांनी पवारांवर टीका केली होती. "पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करणं अपमानास्पद आहे," असं त्यांचं वक्तव्य होतं. या वक्तव्यांनी त्यांना धनगर समाजात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रियता मिळवून दिली, पण त्याचवेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
सिनेसृष्टीतही सक्रिय
पडळकर केवळ राजकारणातच नाही, तर सिनेसृष्टीतही सक्रिय आहेत. त्यांनी 2019 मध्ये 'धुमस' या चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात त्यांनी स्वतः अभिनयही केला. या चित्रपटात साक्षी चौधरी, कृतिका गायकवाड आणि भारत गणेशपुरे यांसारखे कलाकार होते. पडळकरांचा हा सिनेमातील प्रवास त्यांच्या क्रिएटिव्ह व्यक्तिमत्त्वाचा पुरावा आहे. पण राजकारणातही त्यांची 'धुमस' कमी नाही. त्यांची आक्रमक वक्तृत्वशैली आणि विरोधकांवर सातत्याने हल्ला करणारी भूमिका त्यांना वेगळी ओळख देते.
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू कसे झाले?
गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. यामागे त्यांचा धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढणारा स्वभाव आणि राजकीय प्रवास आहे. 2020 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पडळकरांनी सक्रिय सहभाग घेतला आणि ठाकरे सरकारला घाम फोडला. याचा फायदा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपला झाला. धनगर आरक्षणाच्या आंदोलनातही पडळकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांचा धनगर समाजात प्रभाव वाढला.फडणवीसांनी पडळकरांना विधान परिषदेवर संधी दिली आणि 2024 मध्ये जत मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा दिला. पडळकरांची शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील आक्रमक टीका फडणवीसांच्या रणनीतीला पूरक ठरली. पडळकरांनी फडणवीसांना "श्रीकृष्णासारखे" संबोधून त्यांच्यावरील निष्ठा व्यक्त केली आहे. फडणवीसांनीही पडळकरांचं कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्य असल्याचं म्हटलं आहे, पण त्यांना संयम राखण्याचा सल्लाही दिला आहे.
पडळकरांवर "मंगळसूत्र चोर" हा आरोप का झाला?
यामागे एक जुना वाद आहे. त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान गटातटाच्या भांडणातून हा आरोप समोर आला. एका लग्न समारंभात पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात विरोधी गटाशी धक्काबुक्की झाली. यात काही महिलांना धक्के लागले, आणि त्याचवेळी मंगळसूत्र चोरीचा आरोप पडळकरांवर लावण्यात आला. पण या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, आणि हा आरोप राजकीय हेतूने लावल्याचं सांगितलं जातं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.