Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील ६ हजार ४०० कोटींच्या हॉस्पिटल व्यवहारात बॉलिवूड अभिनेत्रीचे कनेक्शन? आरटीआय कार्यकर्त्याचा गौप्यस्फोट

पुण्यातील ६ हजार ४०० कोटींच्या हॉस्पिटल व्यवहारात बॉलिवूड अभिनेत्रीचे कनेक्शन? आरटीआय कार्यकर्त्याचा गौप्यस्फोट
 

पुणे : पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल आणि त्याच्याशी संलग्न इतर रुणालये ताब्यात घेण्याची घोषणा मणिपाल हॉस्पिटल्स ने केली आहे. हा करार सुमारे ६ हजार ४०० कोटी रुपयांचा आहे. हा करार समोर आल्यानंतर पुणे महानगरपालिकेने १७ जुलैला सह्याद्री हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली. डेक्कन भागातील मोक्याच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सह्याद्री हॉस्पिटलकडून खुलासा मागविला आहे.

या वादाच्या केंद्रस्थानी आहे डेक्कनमधील १ हजार ९७६ चौरसमीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. हा भूखंड पुणे महापालिकेने १९९८ मध्ये कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला केवळ १ रुपया प्रति चौरसमीटर वार्षिक भाड्याने ९९ वर्षांसाठी देण्यात आला होता. गरजूंसाठी धर्मदाय रुग्णालय चालवण्यासाठी हा भूखंड देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणावर आता माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हा प्रकार म्हणजे सार्वजनिक जमिनीचा खासगी फायद्यासाठी वापर आहे. या व्यवहारात कोणतीही पारदर्शकता नाही, जबाबदारी नाही आणि गरीब रुग्णांसाठी कोणतीही मदत नाही. १९९८ मध्ये ट्रस्टला जमीन देण्यात आली खरी, पण पुणे महापालिकेने एकही रुग्ण तिथे कधी पाठवलेला नाही. दरम्यान, सह्याद्री हॉस्पिटल प्रा. लि. ही खासगी कंपनी सध्या ही सेवा चालवते. या संस्थेची मालकी एव्हरस्टोन कॅपिटल, नंतर ओटारियो टीचर्स फंड आणि आता मणिपाल हॉस्पिटल समूहाकडे गेली आहे.

आपटे कुटुंबाचा संबंध काय?
कुंभार यांनी म्हटले आहे की, डॉ. चरुदत्त आपटे यांनी १९९६ पासून ट्रस्ट आणि सह्याद्री हॉस्पिटलचे एकत्र नेतृत्त्व केले, ते २०२३ पर्यंत या संस्थेशी संबंधित होते. त्यांच्या कन्या आणि अभिनेत्री राधिका आपटे याही काही काळ ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात होत्या. यामुळे कुटुंबातील हितसंबंधांनी नियंत्रित ट्रस्टद्वारे खासगी नफा मिळवण्याच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे.
कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन?

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, १९९६ मध्ये महापालिकेने या भूखंडाचे आरक्षण रद्द केले होते. पण तरीही १९९८ मध्ये तोच भूखंड ट्रस्टला देण्यात आला. कोणत्या अधिकाराने ही जमीन पुन्हा दिली गेली? कायद्यानुसार प्रक्रिया पार पडली का, असा प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केला आहे.

कुंभार यांच्या मागण्या

मूळ भूखंड लीज कराराची पूर्ण माहिती उघड करावी

ट्रस्ट व खासगी हॉस्पिटल यांच्यात झालेल्या सर्व करारांची माहिती प्रकाशित करावी

मालकी हक्क हस्तांतरणाचे अधिकृत दस्तऐवज सादर करावेत

सामाजिक उपयोगाच्या जमिनीचा वापर खासगी व्यवसायासाठी झाल्याचे चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी

नवीन पायंडा पडतोय का?
हा फक्त एक ट्रस्ट किंवा हॉस्पिटलचा मुद्दा नाही, ही व्यापक प्रणालीगत समस्या आहे. सार्वजनिक मालमत्ता ही खासगी नफ्यासाठी वापरली जाऊ शकत नाही. धर्मादाय हेतूच्या आडून कॉर्पोरेट फायदा घेणे थांबायला हवे. सध्या पुणे महापालिकेकडून या नोटीसवर हॉस्पिटलकडून आलेले उत्तर तपासले जात आहे. येत्या काळात या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील इतर धर्मादाय संस्थांच्या जमिनींचा वापर आणि पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.