सांगली:-जिल्हा परीषद शाळेचा व्यंकटेश भारतीय हॉकी संघात; नेदरलॅडमध्ये गाजवीणार हॉकीचे मैदान
चाकूर - जिल्हा परीषद शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना क्रिडा प्रबोधनीमध्ये निवड झाली, मुलामध्ये असलेल्या गुण लक्षात घेऊन शिक्षक असलेले चुलते व वडीलांनी प्रोत्साहन दिल्यामुळे घरणी (ता.चाकूर) येथील व्यंकटेश धनंजय केंचे या २५ वर्षीय तरूणांची भारतीय हॉकीसंघात निवड झाली असून नेदरलॅड येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील स्पर्धेत तो खेळणार आहे.
घरणी येथील धनंजय केंचे हे सैन्यमध्ये नौकरी होते, यामुळे त्यांनी आपला मुलगा व्यंकटेश यास भाऊ रविंद्र केंचे यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. रविंद्र हे जिल्हा परीषद शाळा गवरदेवीवाडी ता. मिरज जि. सांगली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते त्याच ठिकाणी त्यांनी व्यकंटेशला प्रवेश दिला.
सांगली क्रिडा प्रबोधनीच्या वतीने निवड चाचणी घेतली जात असताना व्यंकटेशची यात निवड झाली यावेळी तो चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. वडील व चुलते व त्यांच्या प्रशिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्या खेळात सुधारणा होत गेली.
सांगली क्रिडा प्रबोधनीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो पुणे येथील क्रिडा प्रबोधनीमध्ये हॉकीचे प्रशिक्षण घेत आहे. मागील आठ वर्षापासून राज्यात संघात तो खेळत आहे. बांगलादेश येथे क्लब टुर्नामेंट खेळली होती. ज्युनिअर व सीनिअर गटात २० वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी नोंदवून सुवर्ण व कास्यपदक पटकावली आहेत. राज्यस्पर्धेत सात वेळेस प्रथम आला आहे.
चार वेळेस ज्युनिअर गटात भारतीय संघाच्या सराव शिबिरात सहभाग नोंदविला आहे. व्यंकटेश गोल करण्यात तरबेज असून, हॉकी स्टीकच्या माध्यमातून पुढच्या संघाला चकवा देत बॉल पळविण्यात पटाईत आहे. नुकत्याच झाशी येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळामुळे त्यांची नेदरलॅ़ड येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील युरोप टूरसाठी भारतीय संघात निवड झाली असून फॉरवर्ड म्हणून तो खेळणार आहे.
८ ते २० जूलै दरम्यान या स्पर्धा होणार असून भारतीय संघाचे सामाने नेदरलॅ़ड, आयर्लंड, फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम या देशासोबत होणार आहेत. व्यंकटेश सध्या बंगळुरू येथे भारतीय संघाच्या सराव शिबिरात प्रशिक्षण घेत आहे. भारतीय संघात त्याची निवड झाल्याबद्दल गावात ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय
माझ्या निवडीमध्ये आई, व़डील, चुलते व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले असून भारतीय संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले हे माझे आदर्श आहेत. युरोप टूरमधील स्पर्धेत उत्कृष्ठ खेळून भारतीय संघाला विजय मिळवून देणार असून भविष्यात ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय आहे.
- व्यंकटेश केंचे, हॉकीपटू
आमच्या कुटुंबाचे स्वप्न पुर्ण
व्यंकटेश चागंल खेळाडू व्हावा यासाठी आम्ही त्याला लहानपणापासून घराच्या बाहेर ठेवले, सध्या आम्ही व तो पुण्यात असूनही आमची भेट होत नाही. हॉकीमध्ये परिश्रम घेतल्यामुळे त्याचा खेळ सुधारला आहे. भारतीय संघात त्याची निवड झाल्यामुले आमच्या कुटुंबाचे स्वप्न पुर्ण झाले असून पुढेही तो चांगले खेळून देशाचे नावलौकिक करेल.
- धनंजय केंचे, व्यंकटेशचे वडील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.