चेन्नई: जयललितांना तिरुनेलवेलीमध्ये सभा घेण्यासाठी जागा हवी होती तेव्हा १०० एकर जमीन स्वतः विकत घेतलेले व्यक्ती म्हणजे नयिनार नागेंद्रन. त्यांचा व्यवसायावर जास्त भर असून, व्यवसायीक उत्पन्नाचे संरक्षण करण्यासाठीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीस केवळ सात
महिने शिल्लक असताना, तामिळनाडू भाजपने निवडणूक तयारी सुरू केली. दक्षिण
जिल्ह्यातील ३० मतदारसंघांसाठी बूथ कमिटी रचली गेली. याच पार्श्वभूमीवर
नेल्लै येथे भाजप बूथ कमिटी परिषद झाली. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह, प्रदेशाध्यक्ष नयिनार नागेंद्रन, माजी अध्यक्ष अण्णामलाई,
तमिळिसाई सौंदरराजन, वानती श्रीनिवासन आदी उपस्थित होते.
यानंतर नयिनार नागेंद्रन यांनी
आपल्या आलिशान घरी अमित शाह यांना चहा देऊन आदरातिथ्य केले. हे घर स्टार
हॉटेलप्रमाणे भव्य असून, अमित शाहही प्रभावित झाले. त्यांचे घर
तिरुनेलवेलीतील पेरुमाळपूरम, सेंट थॉमस स्ट्रीट येथे असून १०,०००
चौ.फुटांहून मोठे, आधुनिक रचनेचे महालासारखे आहे. याच घरी काही
महिन्यांपूर्वी नागेंद्रन यांनी एडप्पडी पलनीस्वामी यांना शंभर पदार्थांसह
मेजवानी दिली होती.
नागेंद्रन
यांचा मूळ गाव तिरुनेलवेली जवळील तंडैयारकुलम आहे. त्यांचे वडील नयिनार
थेवर मोठे जमीनदार होते. त्यांच्या कुटुंबाने आठवडी बाजारांची कंत्राटे,
परवाना असताना दारू दुकाने, क्लब, शेती व जमीन व्यवहारातून प्रचंड संपत्ती
जमवली. तिरुनेलवेली भागात त्यांना लोक "पन्नैयार" (जमींदार) म्हणूनच
ओळखतात.
१९९०-९६ मध्ये मंत्री असताना मिळवलेल्या मालमत्तेवर त्यांनी पुढील तीस वर्षांत अनेकशे कोटींचे साम्राज्य उभारले. तिरुनेलवेलीतील हॉटेल्स, लॉजेस, केरळमधील रिसॉर्ट्स, शेतीजमीन, रिअल इस्टेट यामधून ते प्रचंड उत्पन्न कमावतात. चेन्नईतील ECR भागातील घर व एगमोरमधील ब्लू डायमंड हॉटेलही त्यांचीच मालमत्ता आहे. २००६-२०११ मध्ये द्रमुक सरकार असतानाही त्यांच्या व्यवसायाचा विस्तार झाला. सरकारी बसस्थानकाजवळील हॉटेल्स त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली. आंध्र प्रदेशातील कडप्पा भागातही त्यांचे ग्रॅनाइट खाणी आहेत. जयललितांच्या मंत्रिमंडळात ते ऊर्जा व उद्योग मंत्री होते.२०२१ विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करताना त्यांनी १,५०० कोटींची मालमत्ता व काही प्रकरणे लपवली असल्याचा आरोप झाला. सध्या तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर संपत्ती खरेदी-विक्री करणारे प्रमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे त्यांचा मुलगा नयिनार बालाजी. काही महिन्यांपूर्वी चेन्नई विरुगामबक्कम येथील १०० कोटी किमतीची १.३ एकर जमीन फसवणुकीने नोंदवली असा आरोप बालाजीवर झाला. आज तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेट व्यवहार करणारा प्रभावशाली खेळाडू म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.