दि. 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी थकीत पाणीपट्टी भरणाऱ्याना विलंब दंड व
व्याज शंभर टक्के माफ आमदार सुधीरदादा गाडगीळ महापालिकेच्या ठरावाला राज्य
शासनाची मंजुरी,१९.६६ कोटींचा दिलासा
सांगली, दि.६:दि. 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी थकीत पाणीपट्टी भरणाऱ्याना विलंब दंड आणि व्याज राज्य शासनाने शंभर टक्के माफ केले आहे.सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या हद्दीतील थकीत पाणीपट्टी धारकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे, अशी माहिती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. आमदार गाडगीळ म्हणाले, महापालिकेच्या महासभेने या संदर्भात मंजूर केलेल्या ठरावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. दि. 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी थकीत पाणीपट्टी एकरकमी भरणाऱ्या नागरिकांना १०० टक्के विलंब व्याज माफ करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे नागरिकांना सुमारे १९ कोटी ६६ लाख रुपयांचे व्याज भरण्यापासून सूट मिळणार आहे. साहजिकच त्यामुळे महापालिका क्षेत्रातील आर्थिक भारात मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. महापालिकेच्या महासभेने ठराव (क्र. ५७७, दि. २० जुलै २०२३) मंजूर केला होता. या ठरावानुसार ज्या नागरिकांनी दि. 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी संपूर्ण थकबाकी एकरकमी भरली, त्यांना विलंब व्याजामध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी २० सप्टेंबर २०२३ रोजी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या ठरावाला मंजुरी मिळवण्यासाठी आमदार गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देत सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक यश आले.दि. ६ऑगस्ट२०२५ रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला.आमदार गाडगीळ म्हणाले,या निर्णयामुळे महापालिकेला थकीत वसुली मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे. नागरिकांनाही दि. 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी एकरकमी भरणा केल्यास व्याजातून पूर्ण सूट मिळणार आहे. महापालिकेकडून लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.