सांगलीनजीक कवलापूर येथे नागरी, मालवाहतूक विमानतळाची उभारणी लवकरात
लवकर करा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची मागणी; राज्यमंत्री मोहोळ
यांच्याबरोबर दिल्ली येथे बैठक
दिल्ली,दि.६: सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर (ता. मिरज) येथे नागरी आणि मालवाहू विमानतळ उभारणीसाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. नामदार मोहोळ यांची आमदार गाडगीळ यांनी नवी दिल्लीत भेट घेऊन विमानतळाची उभारणी तातडीने कशी करता येईल यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
आमदार गाडगीळ यांनी सांगितले की, कवलापूर येथे सुमारे १६० एकर जमीन गेल्या सहा दशकांपासून या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. १९६०-६१ पासूनच या ठिकाणी विमानतळ उभारणीचा विचार सुरू आहे. १९८५-८६ मध्ये एका खाजगी विमान वाहतूक कंपनीने एक दोन प्रायोगिक उड्डाणे देखील केली होती. आजही या ठिकाणी हेलिपॅड सुविधा कार्यरत आहे.विविध मान्यवरांची हेलिकॉप्टर तेथे लँड होतात. आमदार गाडगीळ यांनी विमानतळाची गरज स्पष्ट करताना सांगितले की,सांगली, मिरज, कुपवाड, माधवनगरसह संपूर्ण जिल्ह्यातील कृषी, व्यापार, आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हे विमानतळ तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे.द्राक्ष, डाळिंब, गुळ, बेदाणे,हळद व इतर शेतमालाच्या निर्यातीसाठी हवाई मालवाहतूक सुविधा उभारणे काळाची गरज आहे.ते म्हणाले,५ जुलै २०२३ रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कवलापूर येथे विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (MADC) व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्यातील समन्वयातून तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती मिळालेली नाही.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्वरित पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यासाठी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी द्यावी. आमदार गाडगीळ म्हणाले,हा प्रकल्प केवळ एक विमानतळ न राहता, संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा कणा ठरणार आहे. या विमानतळामुळे सांगली मिरज कुपवाड सह जिल्ह्यात मोठे औद्योगिक प्रकल्प येण्यासही चालना मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.