अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा टेरिफमध्ये वाढ करण्याची धमकी दिली आहे. आधीच भारताच्या उत्पादनांवर 25 टक्के टेरिफ लावण्यात आले आहे. त्यामुळे आता भारत आणि अमेरिकेमधील तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवरून ट्रम्प सातत्याने आपणच मध्यस्थी केल्याची विधान करत आहेत. त्यावर पंतप्रधान मोदींनी एकदाही ट्रम्प यांचे नाव घेतलेले नाही.
काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी हाच मुद्दा पुढे करत पंतप्रधान मोदींबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी देशवासियांना उद्देशून म्हटले आहे की, कृपया, समजून घ्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सततच्या धमक्यानंतरही पंतपधान मोदी त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाहीत, यामागचे कारण अदानींविरोधात अमेरिकेतील सुरू असलेली चौकशी हे आहे.
राहुल गांधींनी पुढे म्हटले आहे की, मोदी, AA आणि रशियन तेल करारामधील आर्थिक संबंध उघडकीस आणण्याची एक धमकी आहे. त्यामुळे मोदींचे हात बांधले गेले आहेत, असा निशाणा राहुल गांधींनी सोशल मीडियातून साधला आहे. टेरिफच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हटले होते. त्यावरून राजकीय वातावरण तापले होते. राहुल यांनीही ट्रम्प यांच्या सुरात सूर मिसळत टीका केली होती. आता त्यांनी थेट मोदींचे हात बांधले गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावरूनही आता राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.दरम्यान, अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप उद्योगपती गौतम अदानींवर करण्यात आला होता. मागील वर्षी त्यांच्याविरोधात अमेरिकेत चौकशी सुरू करण्यात आली होती. अदानी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. या मुद्दायवरून राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले होते. विरोधी पक्षातील इतर नेत्यांनीही सरकारला धारेवर धरले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.