एक पद अन् दोघांची नियुक्ती, फडणवीस, शिंदेंनी काढले वेगवेगळे आदेश; करायचं काय? प्रशासनासमोर मोठा प्रश्न
बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावर नियुक्तीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळे आदेश काढत वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केल्याचा प्रकार समोर आलाय. दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय नसल्यानं घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनात मात्र मोठा गोंधळ उडाला आहे. मुख्यमंत्र्यांचा की उपमुख्यमंत्र्यांचा? कोणाचा आदेश पाळायचा असा प्रश्न प्रशासनाला पडलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापक पदासाठी वेगवेगळे आदेश काढले आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास हे नुकतेच निवृत्त झाले. त्यांच्या जागी नव्या महाव्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचे आदेश ५ ऑगस्टला जारी करण्यात आले. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही त्यांच्या खात्यांतर्गत नेमणुकीचे आदेश काढले. एकाच पदावर दोन व्यक्तींच्या नियुक्तीने प्रशासनसमोर मोठा प्रश्न निर्माण झालंय.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आशिष शर्मा यांची बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्ती केलीय. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत नियुक्तीचा जीआर काढलाय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेतील अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीचा आदेश काढलाय. हा आदेश नगरविकास खात्याअंतर्गत जारी करण्यात आला. दरम्यान, एकाच पदावर दोघांची नियुक्तीच्या आदेशामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बिनसल्याच्या चर्चा आहेत. फडणवीस यांच्या परवानगीशिवाय नगरविकास खात्याच्या खर्चाला मंजुरी मिळत नसल्यानं अंतर्गत धुसफूससुद्धा आहे. यातच राज्याच्या पावसाळी अधिवेशनापासून एकनाथ शिंदे यांचे मंत्री अडचणीत येत आहेत. संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. संजय शिरसाट यांचा व्हिडीओ समोर आला होता. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असणाऱ्या बारवर छापा टाकण्यात आला होता. शिंदेंचे दोन्ही मंत्री यामुळे अडचणीत आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.